'हा' तर ढोंगीपणाचा कळस; केशव उपाध्ये यांचे शरद पवार-राहुल गांधी यांना प्रत्युत्तर

11 Aug 2025 14:44:35

मुंबई : शरद पवारांना ज्या वेळी निवडणूक मॅनेज करून देतो म्हणणारी मंडळी भेटली त्याच वेळी त्यांनी ते जाहिर का नाही केलं? कारवाई का नाही केली. आता ती माणसेच आठवत नाही म्हणणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, "सोंग आणिक झोंग, येरझार भोंग, भजन नाही ठाव, तोंड केले गोंगाट। राहुल गांधी आणि आता शरद पवार यांचे मतदार यादी वरून जे सध्या सुरू आहे त्याचे वर्णन करायचे तर तुकाराम महाराजांचा हाच अभंग योग्य आहे. कधी ईव्हीएम वर शंका, तर कधी मतदार यादीवर शंका, पण मुळात जनसेवेचे, विश्वासार्हतेचे व्रतच यांना माहिती नाही. जनता का नाकारते तेच लक्षात न घेता आरोप सुरू आहेत. ईव्हीएम हॅकचा आरोप खोटा ठरला तर आता मतदार यादीवर शंका घेतात."

"ही मंडळी अत्यंत मुलभूत प्रश्नांची उत्तर देत नाहीत. मतदार यादी ही उमेदवाराकडे असते तरी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही? मतदार यादी मोठी असते लक्षात आले नाही, पण मग तुमच्या पक्षाचा पोलिंग एजन्ट काय करीत होता? की, पक्षाच्या पोलिंग एजन्ट वर विश्वास नाही? शरद पवारांना ज्या वेळी अशी निवडणूक मॅनेज करून देतो म्हणणारी मंडळी भेटली त्याच वेळी त्यांनी ते जाहिर का नाही केल? कारवाई का नाही केली? आता ती माणसेच आठवत नाही म्हणणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस आहे. मतदार यादी शुध्दीकरण बिहारमध्ये सुरू आहे, तर त्याला विरोध का?" असा सवाल त्यांनी केला.

स्र्क्रिप्ट रायटिंग चलेगा नही
ते पुढे म्हणाले की, "गल्ला जमवणारे चित्रपट देणाऱ्या सलीम जावेदचा आदर्श कितीही राहूल-शरद या जोडीने घेतला तरी, ये स्र्क्रिप्ट रायटिंग चलेगा नही कारण तुका म्हणे नाथा, शोधी अंतरी, उगाचि बाह्याभास, नाही तुज मिरी," असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

तसेच त्यांनी काँग्रेस आणि राहूल गांधी यांच्या खोटेपणाचे, फेक नॅरेटीव्हचे उदाहरणही दिले. बिहारच्या विशेष मतदार यादी परिक्षणचा फोटो शेअर करत ते म्हणाले की, "बिहारच्या विशेष मतदार यादी परिक्षणचे हे चित्र आपल्या समोर आहे. निवडणूक आयोगाने बिहार मतदार यादी मसुदा १ ॲागस्ट ते ९ ॲागस्ट दरम्यान प्रकाशित केली आणि आक्षेप मागविले. या यादीवर एकाही राजकीय पक्षाने मग तो पक्ष राष्ट्रीय असो की प्रादेशिक, एकाही पक्षाने आक्षेप नोंदवला नाही. एकीकडे नुसते चर्चा आरोप करायचे. असे वाटाव की जणू सगळेच चुकीचे घडत आहे. पण यादी प्रकाशित होताच एकही आक्षेप नोंदवला नाही. सर्व राजकीय पक्ष मिळून १ लाख ६० हजार बीएलओ आहेत पण एकही आक्षेप नाही," असेही केशव उपाध्ये यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0