‘ऑ. सिंदूर’ : द.आशियातील नवे सामरिक समीकरण

11 Aug 2025 21:12:41

भारताचे लष्करप्रमुख आणि हवाईदल प्रमुख यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यांमुळे, ‘ऑपरेशन सिंदूर’ची यशस्विता निश्चितच प्रकर्षाने अधोरेखित झाली. पण, दि. ७ मे रोजी सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आता तीन महिने उलटले असून, दक्षिण आशियातील लष्करी समीकरणांमध्ये मोठा बदल दिसून येत आहे. त्याचे केलेले हे आकलन...

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही जलद आणि ठोस प्रत्युत्तराची कठोर कारवाई केली. प्रारंभी दहशतवादाला चाप लावण्यासाठीची तातडीची मोहीम म्हणून याकडे पाहिले जात होते. मात्र, त्यानंतर घडलेल्या घटनांमधून हे स्पष्ट झाले की, ही केवळ एक दहशतवादाविरोधी कारवाई नव्हती, तर ती भारताच्या लष्करी क्षमतांना नव्या उंचीवर नेणारा आणि शत्रू ाष्ट्रांच्या युद्धनीतीला प्रत्युत्तर देणारा व्यापक धोरणात्मक टप्पा होता.

दि. ६ ऑगस्ट रोजी संरक्षण मंत्रालयाने तब्बल ६७ हजार कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदी प्रस्तावांना प्रारंभिक मान्यता दिली. यामध्ये तिन्ही सैन्य दलांसाठी ८७ स्वदेशी ‘एमएएलई’ (मीडियम अल्टिट्यूड लॉन्ग एन्ड्युरन्स) सशस्त्र ड्रोनची खरेदी, ११० हून अधिक हवाई प्रक्षेपणक्षम ‘ब्रह्मोस’ सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. याच ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांचा वापर ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानातील रडार केंद्रे आणि हवाई तळांवर प्रहार करण्यासाठी झाला होता. याशिवाय नौदलासाठी पाणबुडीविरोधी मोहिमांसाठी युद्धनौका, पर्वतीय भागातील हवाई देखरेख वाढविण्यासाठी पर्वतीय रडार, साक्षम/स्पायडर हवाई संरक्षण प्रणालीचे अद्ययावत करणे, तसेच गुप्त स्वरूपातील उच्च-तंत्रज्ञानावर आधारित गुप्तचर, निरीक्षण, लक्ष्यभेदन आणि इलेट्रॉनिक युद्ध क्षमता वृद्धी करणार्या प्रणालींचा समावेश आहे.

या खरेदींची गती व व्याप्ती हे केवळ नियमित आधुनिकीकरणाचे उदाहरण नाही, तर ‘ऑपरेशन सिंदूर’मधून मिळालेल्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित त्वरित बदलांचे निदर्शक आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या लष्करी सज्जतेमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप आणि त्यातून या दोन्ही देशांच्या पोकळ दाव्यांवर मात करण्यासाठी, भारताने जलद गतीने बहुआयामी युद्धक्षेत्रावर दीर्घकालीन दबाव निर्माण करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

दि. २२ एप्रिल रोजीच्या हल्ल्यानंतर केवळ दोन आठवड्यांत सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय हवाई दलाने ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांचा वापर करून पंजाब आणि सिंधमधील पाकिस्तानी रडार केंद्रे निष्क्रिय केली. तसेच, इलेट्रॉनिक जॅमिंग मोहिमा राबविल्या. या अचूक लांब पल्ल्याच्या हल्ल्यांनी पाकिस्तानच्या लष्करावर मोठा मानसिक दबाव आणला. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी यावर भाष्य करताना ‘विघटनकारी तंत्रज्ञानाशी जलद जुळवून घेण्याची गरज’ अधोरेखित केली.

दरम्यान, पाकिस्तानने चीनकडून लष्करी मदत झपाट्याने वाढविली आहे. ‘झेड-१० एमई’ बहुउद्देशीय हल्लेखोर हेलिकॉप्टर, जे चीनच्या स्वतःच्या मॉडेलपेक्षाही अधिक प्रगत असल्याचे मानले जाते, पाकिस्तानात दाखल झाले आहेत. उच्च उंचीवरील युद्धासाठी तयार केलेली ही हेलिकॉप्टर अत्याधुनिक ‘एव्हिऑनिस’, ‘कंपोझिट आर्मर’, ‘प्रिसिजन स्ट्राईक’ क्षेपणास्त्रे आणि इलेट्रॉनिक प्रतिकार प्रणालीसह येतात. त्याशिवाय, ‘४० जे-३५ स्टेल्थ फायटर्स’, ‘शान्शी केजे-५०० एईडब्ल्यूअॅण्डसी विमाने’ आणि ‘एचयू-१९’ क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली पाकिस्तानकडे येण्याची प्रक्रिया सुरू आहे. चीनच्या उच्चस्तरीय लष्करी नेतृत्वाने, ज्यामध्ये केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष झांग योशिया यांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या लष्करी प्रमुखांशी सलग बैठक घेऊन हा धोरणात्मक सहयोग दृढ केला आहे.

या सगळ्याचा भारतासाठी अर्थ स्पष्ट आहे; चीन आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष आता केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष रणांगणावर दिसत आहे. पाकिस्तान चीनसाठी केवळ एक ग्राहक राष्ट्र न राहता, त्याच्या प्रगत शस्त्रास्त्रांचे परीक्षणक्षेत्र आणि भारताविरुद्धचा दबावबिंदू बनत आहे. परिणामी, भारतासाठी दोन आघाड्यांचा धोका अधिक ठळक बनत आहे.

भारतीय सैन्यदलांचा प्रत्युत्तर दृष्टिकोनही तितकाच स्पष्ट आणि कणखर आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला ‘ग्रे झोन’मधील उच्च-धोरणात्मक बुद्धिबळाचा खेळ म्हटले आहे, जेथे प्रत्येक चाल नियोजनपूर्वक होती. या मोहिमेत पाकिस्तान व पाकिस्तानाधीन काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा अंत करण्यात आला.

हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधील अद्वितीय हवाई यश उघड केले. पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान (बहुधा एईडब्ल्यूअॅण्डसी) पाडण्यात आले, जे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे पृष्ठभाग ते हवा यश आहे. शाहबाज जेकबाबाद हवाईतळावरील ‘एफ-१६ हँगर’ अंशतः उद्ध्वस्त झाला, ज्यामध्ये काही विमानांचे नुकसान झाले असण्याची शयता आहे.

यातील ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे नुकसान हा केवळ पाकिस्तानसाठी धक्का नाही, तर अमेरिकन शस्त्रास्त्र उद्योगासाठीही तो मोठा आघात ठरला आहे. ‘एफ-१६’ हे अमेरिकेच्या संरक्षण उद्योगाचे दीर्घकाळचे प्रतीक आणि अनेक देशांच्या हवाई दलाचे आधारस्तंभ आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे या विमानांच्या अभेद्यतेबद्दल शंका निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या शस्त्र लॉबीचा ‘इगो’ दुखावला गेला असून, यामुळे भारताने जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत एक नवीन समीकरण निर्माण केले आहे. हा बदल केवळ भारताच्या लष्करी क्षमतेमुळेच नव्हे, तर त्याच्या भूराजकीय स्थानामुळेही महत्त्वाचा ठरत आहे. अनेक विश्लेषकांचे मत आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयातशुल्क लादण्याचा मुद्दा आक्रमकपणे ताणण्यामागे या घटनेचाही सूक्ष्म प्रभाव असू शकतो. कारण, अमेरिका आपली शस्त्र प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी राजकीय दबावाचा वापर करते.

‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ दहशतवादाविरोधी कारवाई नव्हती, तर दक्षिण आशियातील सामरिक शक्तिसंतुलनाला बदलणारे निर्णायक पाऊल होते. चीन-पाकिस्तान लष्करी आघाडी, प्रगत शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण आणि रणांगणावर त्यांचा प्रत्यक्ष वापर, यामुळे भारतासाठी दोन आघाड्यांचा धोका ठळक झाला आहे. भारताने घेतलेली जलद शस्त्र खरेदी आणि तंत्रज्ञान उन्नती ही केवळ प्रत्युत्तर नाही, तर दीर्घकालीन सामरिक वर्चस्वासाठीची गुंतवणूक आहे. ‘एफ-१६’ विमानांचे नुकसान हे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारताचा प्रभाव वाढवणारे ठरले असून, अमेरिकन संरक्षण उद्योगाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. पुढील काळात हा शस्त्र स्पर्धेचा प्रवास थांबेल की, अधिक तीव्र होईल, हा दक्षिण आशियाच्या सुरक्षेतील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असेल.
Powered By Sangraha 9.0