मुंबई : कोण ‘चिफ मिनिस्टर‘ आणि कोण ‘थिफ मिनिस्टर‘ हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले असून तिकडे राहुल गांधींचे आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला, असे प्रत्युत्तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
सोमवार, ११ ऑगस्ट रोजी महायूती सरकारच्या विरोधात उबाठा गटाकडून राज्यभर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दरम्यान, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरे जी, खंडणीखोरांचे सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चिफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘थिफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. वाझे काय लादेन आहे का? असे म्हणत उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटी वसुली सुरू होती हे जनता विसरली नाही. त्यामुळे देवेंद्रजींवर टीका करताना जरा आपला भूतकाळ आठवा आणि विचार करून बोला. बाकी इंडी आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्राने बघितली. आजही आपल्याला शेवटच्या रांगेत उभे राहावे लागेल म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेला नाहीत आणि इथे चार टाळके घेऊन आंदोलन केले. तिकडे राहुल गांधींचे आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला."
मुख्यमंत्री असताना लोकशाही आणि नैतिकतेचा गळा घोटला"उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता. आज देवेंद्रजींसारख्या प्रामाणिक नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला आरशात पाहायला हवे. देवेंद्र फडणवीस यांचे काम हे फक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचे नाही, तर स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे आहे. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला लोकं कंटाळले आहेत," अशी टीकाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.