मुंबई : "आरोग्य आणि शिक्षण या समाजाच्या मूलभूत गरजा आहेत. शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक आहे, तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे. दुर्दैवाने, आज चांगले आरोग्य व दर्जेदार शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पूर्वी हे सेवा कार्य मानले जात होते, परंतु आता आरोग्यसेवा व शिक्षण हे दोन्हीही व्यापारी उपक्रम झाले आहेत. शिक्षणाला पूर्वी पवित्र कर्तव्य मानले जात होते, पण आज समाजात मोठा बदल झाला आहे. तरीही शिक्षकांनी हे भान ठेवले पाहिजे की अध्यापन हे त्यांच्या आयुष्याचे उत्तरदायित्वच राहिले पाहिजे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
इंदूरच्या श्री गुरुजी सेवा न्यास माधव सृष्टीच्या कॅन्सर केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सरसंघचालकांनी सर्वांसाठी सुलभ व परवडणारी आरोग्यसेवा आणि शिक्षण यांचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की चांगल्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अनेकदा दूर जावे लागते, तर प्रगत वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णांना मोठ्या शहरांत जावे लागते. देशाला परवडणारी व सहज उपलब्ध आरोग्यसेवा हवी आहे. उपचार स्वतःच चिंता निर्माण करणारे होऊ नयेत. पाश्चात्त्य पद्धत एकच कल्पना सर्वत्र लागू करण्याची असते, पण परदेशात झालेले वैद्यकीय संशोधन सर्वत्र लागू होईलच असे नाही, कारण जग विविधतेने भरलेले आहे.
इंदूर प्रकल्पाचे कौतुक करताना सरसंघचालकांनी नम्रतेचा सल्ला दिला व आत्मगौरव टाळण्याचे आवाहन केले. “स्वतःला मोठा कार्यकर्ता समजू नका. आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे आणि ती सातत्याने करायची आहे. चांगली कर्मे करा आणि विसरा; लहान लहान पावले पुढे टाका. या कामाचा अभिमान वाटणे योग्य आहे, पण अहंकाराला वाव देता कामा नये.”
श्री गुरुजी सेवा न्यासचे अध्यक्ष मुकेश हजेला यांनी सांगितले की न्यासाच्या आरोग्य केंद्रांमधून आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना लाभ झाला आहे. या प्रकल्पाचा उद्देश आर्थिक अडचणींमुळे उपचार परवडत नसलेल्या लोकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे. श्री गुरुजी सेवा न्यास माधव सृष्टी कॅन्सर केअर सेंटर इंदूरमध्ये ₹९६ कोटी खर्चून दोन टप्प्यांत उभारले जात आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ₹२६ कोटींचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यात दोन बेसमेंट, भूतळ आणि तीन मजले समाविष्ट आहेत. यांचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात उच्च तंत्रज्ञानयुक्त उपकरणे बसविणे व अतिरिक्त मजल्यांचे बांधकाम करण्यात येईल. हा संपूर्ण प्रकल्प जनसहभागातून उभा राहतो आहे, तसेच कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गतही योगदान मिळत आहे.