
मुंबई : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष पूज्य महंत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना '३६ वा डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान' नुकताच प्रदान करण्यात आला. हा सन्मान सोहळा रविवारी कोलकाता येथे श्री बडाबाजार कुमारसभा वाचनालयाच्या वतीने नॅशनल लायब्ररी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सन्मानस्वरूप एक लाख रुपयांचा धनादेश आणि मानपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, जगाचे मंगल भारताच्या विचारांत आहे आणि भारताची शक्ती ही संघटित हिंदू समाजात आहे. आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. हेडगेवार हे ध्येयवेडे आणि ध्येयासाठी समर्पित होते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी राष्ट्र संघटनेचे आलोक पाहिले. त्यांच्या त्याग-तपस्येमुळेच आज भारत पुन्हा विश्वगुरू होण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
समारंभाचे अध्यक्षपद सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांनी भूषविले. तर मुख्य वक्ते म्हणून प्रबुद्ध चिंतक मुकुल कानिटकर उपस्थित होते. ते म्हणाले,'आज भारत आपल्या संस्कृती आणि समृद्धीने जगावर प्रभाव टाकत आहे. हे कार्य संघटन, सेवा आणि व्यवस्था परिवर्तनामुळे शक्य झाले. डॉ. हेडगेवार यांनी समाजात संघटनेची गरज अधोरेखित करत व्यक्तिनिर्माणाला राष्ट्रनिर्माणाचा पाया मानले होते. त्यांची हिंदुत्वाची विचारसरणी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रभावित करून गेली आहे.'
या सन्मान समारंभाला कोलकाता आणि हावडा स्थित सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.