नवी दिल्ली, काँग्रेस आणि इंडी आघाडी देशातील घटनात्मक संस्था आणि भारतीय सैन्यास लक्ष्य करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यात आघाडीवर असून ते देशविरोधी शक्तींच्या हातचे बाहुले बनले आहेत, असा सणसणीत टोला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी लगावला आहे.
काँग्रेसप्रणित इंडी आघाडीने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले. संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्यालय असा विनापरवानगी मोर्चा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी आंदोलक खासदारांची धरपकड केल्यानंतर काही वेळातच हे आंदोलन संपले.
काँग्रेस आणि इंडी आघाडीस केंद्र सरकारतर्फे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, राहुल गांधी यांच्यावर देशविरोधी शक्तींचा दबाव असून ते त्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. ते आणि त्यांची इंडी आघाडी भारतीय लोकशाहीस बदनाम करून घटनात्मक संस्थांना लक्ष्य करत आहेत. ईव्हीएमनंतर राहुल गांधी यांनी आता एसआयआरचा मुद्दा उपस्थित करून देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी यापूर्वी कॅग आणि सर्वोच्च न्यायालयावरही अविश्वास दाखवून त्यांची बदनामी केली आहे. धक्कादायक म्हणजे भारतीय सैन्याच्या शौर्यावरही त्यांनी संशय व्यक्त केला. भारतीय सैन्याने पुरावे देऊनही राहुल गांधी यांची भूमिका कायम होती, असा टोला त्यांनी लगावला.
केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये विरोधी पक्षाच्या निवडणूक विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी आणि इंडी आघाडीच्या नेत्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. तेलंगणा, तामिळनाडू आणि झारखंडमध्येही अशाच घोळामुळे निवडणूका जिंकल्या का ?, राहुल गांधी, प्रियांका गांधी – वाड्रा आणि अखिलेश यादवही अशाच प्रकारे विजयी झाले का, असाही सवाल केंद्रीय मंत्री चौहान यांनी यावेळी विचारला.
निवडणूक आयोगाच्या चर्चेकडे पाठमतदार यादीतील कथित घोळाविषयी चर्चा करण्याचे निमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या पत्रावर दिले होते. आयोगाने ३० खासदारांच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी येण्यास सांगितले होते. मात्र, काँग्रेस आणि इंडी आघाडीने सर्वच खासदारांना चर्चेसाठी येऊ द्यावे; अशी आडमुठी भूमिका घेऊन आंदोलन केले. त्यामुळे काँग्रेस – इंडी आघाडीस केवळ आरोपांची राळ उडवून देण्यातच रस असल्याचे दिसून येते.
राहुल गांधी संविधानविरोधी – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाजप मुख्यालयात पत्रकारपरिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, इंडी आघाडी आणि विशेषतः काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी दररोज संविधानाचे नाव घेत असतात. मात्र, सध्याची स्थिती पाहता संविधानविरोधी टोळीचे सरदार हे राहुल गांधीच आहेत. एसआयआर ही निवडणूक आयोगाची नियमित प्रक्रिया असून ती यापूर्वीदेखील करण्यात आली आहे. पराभवामुळे नैराश्यात आलेल्या काँग्रेसने आता देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा टोली केंद्रीय मंत्री प्रधान यांनी लगावला.