मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मसुदा लेदर, नॉन-लेदर, फुटवेअर व ॲक्सेसरीज धोरण २०२५ संदर्भात भागधारकांची सल्लामसलत बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्सचे कार्यकारी संचालक आर. सेल्वम यांनी भूषविले.
बैठकीच्या सुरुवातीस विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी राज्यातील लेदर व फुटवेअर क्षेत्राची सद्यस्थिती, सामर्थ्ये तसेच प्रस्तावित धोरणाचे मुख्य आधारस्तंभ यांची माहिती दिली. त्यांनी धोरणातील विविध तरतुदींबाबत उपस्थितांना अवगत केले.
या बैठकीत उद्योग संघटना, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, निर्यातदार, क्लस्टर प्रमुख तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. फुटवेअर मॅन्युफॅक्चरर्स वेल्फेअर असोसिएशन आणि इतर उत्पादक संघटनांनीही आपली मते व सूचना मांडल्या.
सल्लामसलतीतून धोरणाच्या पुढील टप्प्यात विचारात घेता येतील अशा मुद्द्यांची नोंद करण्यात आली आहे.