कल्याण, शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत रविवारी सकाळच्या प्रहरी महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कल्याण डोंबिवलीतील कल्याण सायकलीस्ट ग्रुप, डोंबिवली सायकलीस्ट ग्रुप ,हिरकणी महिला सायकलिस्ट ग्रुप, पलावा सायकलिस्ट ग्रुप, बाईकपोस्ट सायकलिस्ट ग्रुप,एव्हरग्रीन सायकलप्रेमी ग्रुप ,डोंबिवली या संस्थांच्या सुमारे २०० सदस्यांनी, सायकल प्रेमींनी या रॅलीत सहभाग घेतला होता.
या सायकल रॅलीचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड आणि विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी आयुक्त निवासापासून महापालिका मुख्यालयापर्यंत स्वतः सायकल चालवीत तदनंतर सायकल रॅलीतही समक्ष सहभाग घेतला.
अभिनव गोयल म्हणाले, तिरंग्याविषयी अभिमान, देशभक्तीची प्रेरणा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश ही रॅली नागरिकांपर्यंत पोहोचवेल. या सायकल रॅलीच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याला मानवंदना देण्यासह आपल्या वीर जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा सायकल रॅलीचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सायकल हा आरोग्यदायी जीवनशैलीचा उत्तम पर्याय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या समयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त संजय जाधव, समीर भूमकर कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत ,घनश्याम नवांगुळ, योगेंद्र राठोड ,महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसिडर डॉ. प्रशांत पाटील, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे, महापालिकेचे सहा.आयुक्त धनंजय थोरात, उमेश यमगर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.