सांस्कृतिक एकात्मता हाच अखंड भारताचा पाया

10 Aug 2025 20:31:27

मुंबई  :
थायलंड, कंबोडिया आणि बर्मा हे बौद्ध देश असल्यामुळे तिथली संस्कृती आपल्याशी संलग्न आहे. इंडोनेशियात देखील भारतीय संस्कृती आढळते. त्यामुळेच सांस्कृतिक एकात्मता हाच अखंड भारताचा पाया आहे, असे मत लेखक आणि विचारवंत पुलींद सामंत यांनी व्यक्त केले. ठाणे येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात अखंड भारत व्यासपीठ व एकात्म विकास परिषद आयोजित अखंड भारत परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, इंडोनेशियातील जावानीस लोक अगस्ती ऋषींना आपले पूर्वज मानायचे. कौंडिन्य ऋषींना कंबोडिया अजूनही आपले पूर्वज मानतात. त्यामुळे सांस्कृतिक एकात्मता हाच भारत आणि भारतापासून वेगळ्या झालेल्या राष्ट्रांमधील दुवा आहे. या अन्य राष्ट्रांबरोबर आपल्याला चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतील. इंडोनेशियातील बाली बेटावर आता हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. इंडोनेशियाच्या नोटेवरचा गणपती देखील २००८ साली बदलण्यात आला. त्यामुळे यामध्ये भारताला भविष्यात अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर म्हणाले की, आज विश्वभरात भारताचे एक स्थान तयार झाले आहे. आज जगातील अनेक देशांना वाटते की, भारत हा सहअस्तित्व देणारा देश आहे. भारत नेहमीच 'सर्वेपि सुखीन संतु' याचीच इच्छा ठेवतो. अखंड भारत हे शाश्वत सत्य आहे.

लेखक प्रशांत पोळ यांनी, भारताच्या विभाजनाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला. तर प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय कार्यकर्ते सदानंद सप्रे यांनी, विभाजन कसे समाप्त केले जाऊ शकते आणि त्यामध्ये भारतीयांची भूमिका काय? यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय जगताप, सूत्रसंचालन सुनील डेंगळे यांनी केले. तर समारोप प्रज्ञा प्रवाहचे पश्चिम क्षेत्र संयोजक सुनील कीटकरू यांनी केला.

यावेळी एशियाटिक विद्या परिषदचे अध्यक्ष विवेक गणपुले आणि अखंड भारत व्यासपीठचे अध्यक्ष संजय ढवळीकर व संघटक मोहन अत्रे उपस्थित होते.

यावेळी अखंड भारत व्यासपीठचे संघटक मोहन अत्रे यांनी लिहिलेलं 'हिंदू युवका, उठ पेटुनी...' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0