परिवर्तनाची चिरकाल प्रेरणा : अण्णा भाऊ साठे

01 Aug 2025 20:54:04

‘जग बदल घालुनी घाव...’ असं म्हणणारे सुप्रसिद्ध समाजसुधारक, लेखक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सर्वार्थाने भाषेच्या, राष्ट्राच्या सीमा ओलांडून अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले. त्यांच्या ज्वलंत लेखणीमुळे परिवर्तनाचा वेगळा विचार मराठी मातीमध्ये पेरला गेला. काल त्यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या याच साहित्यविश्वाचा घेतलेला धांडोळा...

अण्णा भाऊ साठे म्हणजे मराठी संस्कृतीच्या चळवळीची आद्य प्रेरणा. मराठी संस्कृतीच्या भावविश्वाचा विचार करायचा झाल्यास, इथे ज्ञानेश्वरांची ओवी, तुकोबांचे अभंग, संत एकनाथांचे भारुड एकत्रितपणे नांदतात. मराठी मनांची मशागत करण्याचं काम या संतांनी आपल्या वचनांमधून केले. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे सांगतात की, "महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ निर्माण झाली, कारण आपल्याकडे भक्ती-परंपरेचा उदय झाला.” भक्ती-परंपरेच्या माध्यमातून समाजामध्ये आपल्याला आजवर कित्येक स्थित्यंतरे अनुभवायला मिळाली. एका बाजूला अनिष्ट रूढींच्या जोखडातून समाज मुक्त झाला आणि दुसर्या बाजूला संतांच्याच शिकवणुकीच्या माध्यमातून समाजाला आपल्या उत्कर्षाचा मार्ग सापडला. पुढे इंग्रजांच्या गुलामगिरीविरोधात याच मराठी मातीने पहिल्यांदा एल्गार पुकारला. एका बाजूला जुलूमशाही, हुकूमशाहीच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिलेला महाराष्ट्र, दुसर्या बाजूला समाजाचं अंतरंग विकसित करण्याचे काम आपल्या समाजसुधारकांनी केले. आधुनिकतेचे वारे वाहात असताना, शाश्वत विकासाचा विचार आपल्याकडच्या समाजसुधारकांनी मांडला. महादेव गोविंद रानडे यांसारख्या तत्त्वचिंतकाने, समाजसुधारणेबरोबरच, कृषी क्षेत्रातील आधुनिक धोरणांचासुद्धा विचार केला होता. देशाचे स्वातंत्र्य नजरेत नसतानासुद्धा, स्वातंत्र्योत्तर काळातील भारत कशा रितीने विकसित होईल, यासाठी आपले लोक कार्यरत होते. पुढे लोकमान्य टिळकांसारख्या दीपस्तंभाने पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये क्रांतीचा, स्वराज्याचा, विचार पेरला. दुसर्या बाजूला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यातून सुधारणावादी विचार सातत्याने पुढे येत होता.

सत्याग्रहाचं नवीन शस्त्र स्वातंत्र्यसंग्रामात वापरणारे महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले यांना आपले गुरू मानत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गांधींनी भारत देश, इथली माणसं, इथलं समाजकारण समजून घेतलं. स्वातंत्र्यसंग्रामातील पुढच्या अनेक लढायांमध्ये मराठी माणसं अग्रेसर होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर, जेव्हा भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न समोर आला, त्यावेळेलासुद्धा या मराठी मातीने एक आगळावेगळा समरप्रसंग पाहिला. काँग्रेसच्या जुलमी राजवाटीविरोधात गटतटात विभागलेले अनेक मराठी नेते, सामाजिक कार्यकर्ते, कामगारवर्ग एकत्र आले आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. या लढ्याला आवाज दिला तो पत्रकारांनी, साहित्यिकांनी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शाहिरांनी. आपल्या कलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचे अत्यंत महत्त्वाचं काम शाहिरांनी केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे याच चळवळीतील महत्त्वपूर्ण नाव. तत्कालीन प्रस्थापित सत्तेच्या विरोधात संघर्षाचे बिगुल अण्णा भाऊंनी वाजवले. मराठी मुलखाला स्वतंत्र करण्यासाठी उभारलेला लढा कलावंतांच्या, कामगारांच्या, त्यागामुळे यशस्वी झाला.

अण्णा भाऊ साठे हे नाव तेव्हापासूनच अनेकांच्या काळजावर कोरलं गेलं, ते कायमचं. अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून कामगारवर्गाचे जीवन तर मांडलेच, परंतु त्याचसोबत, त्यांच्या लिखाणातून स्थलांतरितांचे भावविश्वसुद्धा उलगडायचं. एका बाजूला कामगारांचं जग दाखवणार्या अण्णा भाऊ दुसर्या बाजूला, मराठी मुलखातील विस्थापित, आदिवासींच्या जीवनाचंसुद्धा तितयाच सूक्ष्मपणे चित्रण करत होते. अनेकांच्या मते, अण्णाभाऊंच्या शब्दांना वेदनेची किनार होती. परंतु, ती वेदना कोरडी नव्हती, या संघर्षाच्या अंधाररात्रीनंतर आशेचा सूर्य उगवणार आहे, हा विचारसुद्धा त्यांच्या लेखणीने दिला. अण्णा भाऊ साठे यांची ‘फकीरा’ कादंबरी आजसुद्धा तितकीच लोकप्रिय आहे, जितकी ती प्रकाशनाच्या वेळी होती. अण्णा भाऊंचे साहित्य जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादितदेखील झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ज्या प्रकारे सर्व सीमा ओलांडल्या आहेत. आधी त्याच प्रकारे साहित्याच्या प्रांतातसुद्धा सर्व सीमा ओलांडून अण्णा भाऊंचे शब्द अनेकांना नवी दिशा देत आहेत. अण्णाभाऊंचे शब्द, त्यांनी मांडलेले विचार जुने होत नाही, हीच त्यांची चिरकाल प्रेरणा आहे. त्यांच्या याच प्रेरणेविषयी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणार्या लोकांनी मांडलेले हे विचार.

नव्या युगाचे लेखक!


अण्णा भाऊ साठे यांची साहित्यविषयक ओळख शाहीर आणि कादंबरीकार अशीच आहे. शाहीर आणि लेखक म्हणून अण्णा भाऊ सर्वांसोबत होते. त्यांनी आपल्या लेखनातून गावगाडा, गावगाड्या बाहेरचा समाज, भटके-विमुक्त, स्त्रिया तसेच महानगरीय जीवन असा समग्र पट चित्रित केला. प्रामुख्याने सामान्य कष्टकरी, दलित, ग्रामीण, भिकारी, चोर, गुन्हेगार तसेच वंचित घटकातील स्त्रिया यांना आपल्या लेखनाचे नायकत्व बहाल केले. सामान्य कष्टकर्यांच्या चांगुलपणावर, सद्भावनांवर, त्यांच्या संघर्षावर अण्णाभाऊंचा मनःपूर्वक विश्वास होता. सामान्य माणसाच्या मुक्ततेच्या वाटा त्यांनी अधोरेखित केल्या. कष्टकरी समाजाची भविष्यदर्शी वाट सुखाची कशी होईल, याची गणितं अण्णा भाऊ आपल्या लेखनातून मांडत राहिले. यातूनच त्यांच्या लेखनातून चित्रित झालेला ‘उद्या’ हा आश्वासक आहे. त्यांचे क्रांतिकारी मन नव्या युगाविषयी स्वागतशील आहे. आजही सामान्य माणसाला जगण्याची प्रेरणा आणि बळ या लेखनातून मिळते.

- डॉ. दत्ता घोलप, संपादकीय साहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय, वाई

माणसाच्या मुळांचा शोध घेणारा साहित्यिक

रूढार्थाने कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अण्णाभाऊंनी केवळ साहित्यालाच नाही, तर जगाला नवा विचार दिला. तत्कालीन व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे आणि गरज पडल्यास त्या व्यवस्थेविरोधात उभा राहण्याचे बळ त्यांच्या लेखणीने दिले. त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे दुःख मांडले. अण्णा भाऊ हे कामगारवर्गाचे प्रतिनिधित्व करत होते, एक स्थलांतरित कामगार आपली माती, आपली मुळे सोडून कामानिमित शहरात येतो. त्यावेळी त्याच्या मनाची जी अवस्था असते, त्यांना अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून अत्यंत सुंदररित्या मांडली आहे.

- नामदेव कोळी, कवी

राष्ट्रांच्या सीमा ओलांडणारी लेखणी!

अण्णा भाऊ साठेंच्या लेखणीमध्ये आपल्याला ग्रामीण संस्कृतीच्या जाणिवा दिसतात. त्यांची ‘फकीरा’ ही कादंबरी आज साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा मानदंड आहे. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मानवजातीच्या विकासासाठी आवश्यक असणारी करूणेची भूमिका मांडलेली आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय विषयांचे चिंतनसुद्धा आढळते. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अण्णा भाऊ साठेंच्या लेखणीने राष्ट्रांच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत. जर्मनी, पोलंड, रशिया आदी देशांमध्ये आपल्याला अण्णाभाऊंचे साहित्य त्या त्या देशातील भाषांमध्ये अनुवादित झालेले बघायला मिळते. संघर्ष करणार्या माणसांच्या जाणिवा भाषेच्या पलीकडे माणसांना एकमेकांशी जोडतात. अण्णाभाऊंची ‘फकीरा’ ही कादंबरी ज्या वेळेला मी इंग्रजीत भाषांतरित केली, त्यावेळेस असं लक्षात आलं की, अण्णा भाऊ साठे म्हणजे देशांना जोडणारा सांस्कृतिक दुवा आहे.

- डॉ. बळीराम गायकवाड, संचालक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र तथा संचालक, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग, मुंबई विद्यापीठ


संस्कृतीच्या मुळांचं प्रतिनिधित्व करणारे साहित्यिक

अण्णा भाऊ साठेंच्या लेखणीमध्ये आपल्याला तत्कालीन परिस्थितीवर केलेलं भाष्य बघायला मिळतं. त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यावेळेच्या देशाची, संस्कृतीची जडणघडण कशी झाली, याची प्रचिती आपल्याला येते. आपल्याकडच्या अनेक गोष्टींवर आताच्या घडीला पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. ‘कोरोना’नंतर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये हा प्रभाव जास्तच झालेला आपल्याला दिसून येतो. अशा सांस्कृतिक वातावरणामध्ये अण्णा भाऊ साठे यांचे लेखन, विचारसंस्कृतीच्या मुळाचं प्रतिनिधित्व करतात.

- संजय कांबळे, युट्यूबर
Powered By Sangraha 9.0