
मुंबई : "भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते.
"आज अनेक कलाकार परकीय विचारांच्या प्रभावामुळे भरकटले आहेत. त्यांनी आपल्या समाजाच्या मूळ प्रश्नांपासून दूर जाऊन केवळ तात्कालिक प्रसिद्धीसाठी कृत्रिम आंदोलने उभी केली आहेत. शाहीर अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मातीतून उगम पावलेल्या विचारांनी क्रांती घडवली. आजही या विचारसरणीवर आधारित साहित्य आणि कला समाजाला दिशा देऊ शकतात. त्यामुळे अशा चळवळीत भरकटलेल्या कलाकारांनी आता परकीय विचारवंतांना दुर्लक्षित केले पाहिजे आणि आपल्या कलेकडे लक्ष दिले पाहिजे.” अशी भूमिका संदेश उमप यांनी मांडली.
साठे आणि उमप कुटुंबातील स्नेह, कलासंपन्न सहकार्य आणि लोकशाहीर परंपरेचा प्रभाव सांगताना ते म्हणाले की, "अण्णा भाऊ साठेंच्या लेखणीतून शोषित समाजाचे दुःख बोलते झाले आणि त्याच शब्दांना विठ्ठल उमप यांच्या आवाजातून लोकांपर्यंत प्रचंड ताकदीने पोहोचवण्यात आले.”
ते पुढे म्हणाले की, "अण्णा भाऊंच्या विचारांनी प्रेरित अनेक कलावंत आजही कार्यरत आहेत. मात्र, त्यांना शासनाच्या पाठबळाची आवश्यकता आहे. ज्याप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर साजरी केली जाते, त्याच धर्तीवर अण्णा भाऊ साठे यांची जयंतीही शासनाने भव्य स्वरूपात साजरी करावी. नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सण ठरावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या मुलाखतीनिमित्त त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने ‘भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा’ हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला.