झुकणारा नव्हे झगडणारा भारत!

01 Aug 2025 21:34:01

भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना, ट्रम्प यांच्याकडून सातत्याने होणारी ही टीका म्हणजे भारत सरकारला अमेरिकन शर्थींवर झुकवण्याचाच प्रयत्न. पण, मोदींंच्या नेतृत्वातील नवभारत हा झुकणारा नव्हे, तर झगडणारा भारत आहे, हे ट्रम्प यांनी लक्षात घ्यावे!

भारताची वेगवान आर्थिक प्रगती, जागतिक पातळीवर भारताच्या भूमिकेला प्राप्त होणारे अनन्यसाधारण महत्त्व आणि संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारता’ने केलेली अद्वितीय कामगिरी अमेरिकेच्या डोळ्यात खुपते का, असाच प्रश्न आता उपस्थित होतो. त्याचे कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांत अमेरिका, विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत केलेली वादग्रस्त, विरोधाभासी आणि एकतर्फी वक्तव्ये. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के व्यापार कर आकारण्याचा जो एकतर्फी निर्णय जाहीर केला, तो अमेरिकेच्या व्यापार धोरणातील फसवणूक स्पष्ट करणाराच म्हणावा लागेल. व्यापाराच्या मुद्द्यावरून भारतावर दबावतंत्र वापरण्याचा, संरक्षण सामग्री आणि तेलखरेदीच्या भारताच्या सार्वभौम निर्णयाला रोखण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून पद्धतशीरपणे सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारने याप्रसंगी उघड शब्दांत अमेरिकेला विरोध केला नसला तरी, त्यांचे सूचक मौन हा अधिक प्रभावी संदेश देणारे ठरलेले दिसते.

ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्था ‘मृतवत’ असल्याचे विधान करत स्वतःच्याच अज्ञानावर शिक्कामोर्तब केले. भारतीय अर्थव्यवस्था आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून, आकडेवारी हे सांगते की, भारताचा नाममात्र जीडीपी ३.७ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला असून, २०३० पर्यंत भारत पाच ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडणार, हे निश्चित. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणून संबोधले, तर दुसरीकडे ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ या जगप्रसिद्ध संस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आशादायक अंदाज व्यक्त केला. नाणेनिधीने २०२५-२६ साठी भारताचा आर्थिक वृद्धीदर ६.४ टक्क्यांवर वाढवून भारताचा जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था, असा दर्जा कायम ठेवला. नाणेनिधीने स्पष्टपणे म्हटले आहे की, भारताच्या वाढीचा दर हा चीनपेक्षा अधिक असून, तो अमेरिका, युरोप आणि इतर प्रगत अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे. दुसरीकडे, अमेरिका स्वतःच महागाई, दिवाळखोरी, व्याजदरवाढ या आर्थिक दुष्टचक्रात सापडलेली. अमेरिकेत बेरोजगारीचा दर चार टक्क्यांच्याही पुढे गेला असून, ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदर नीती अजूनही द्विधा मनःस्थितीत आहे. म्हणूनच अमेरिकेवर मंदीचे सावट तीव्र झाले आहे.

२५ टक्के आयातकर भारतावर लावण्याचा ट्रम्प यांचा इशारा, हा केवळ अमेरिकी संरक्षणवाद नाही, तर तो भारताच्या आर्थिक वाढीला दडपण्याचा प्रयत्न आहे. भारताच्या स्वावलंबी धोरणामुळे आता अमेरिका अस्वस्थ आहे. अमेरिकी शस्त्रास्त्रे भारताने विकत घ्यावीत, हा अमेरिकेचा आग्रह. तथापि, भारताने स्वतःच्या अटी-शर्तींवर आजवर संरक्षणविषयक करार केले आहेत. म्हणूनच, अमेरिकी लढाऊ विमानांपेक्षा फ्रान्सच्या ‘राफेल’ला भारताने निवडले. तसेच रशियाच्या ‘सुखोई’ची निवड भारताने यापूर्वी केली. ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी अमेरिकी लढाऊ विमाने भारताने पाडली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. यावरून, भारताची निवड चुकलेली नाही, हेच यातून अधोरेखित होते. रशियाने भारताला ‘एस-४००’ ही क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली दिली. भारताने ती रशियाकडून खरेदी करू नये, यासाठीही अमेरिकेने भारतावर दबाव आणला होता. मात्र, त्यावेळीही भारताने तो झुगारून देत ती खरेदी केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकमधील दहशतवादी तळ हवाई हल्ला करून नष्ट केले, तेव्हा संतापलेल्या पाकने भारतावर एकाएकी क्षेपणास्त्रे तसेच ड्रोनहल्ला केला. यांना हवेतच रोखून पाडण्यात या ‘एस-४००’ प्रणालीचे, अर्थातच ‘सुदर्शन चक्र’चे मोलाचे योगदान होते. रशिया-युक्रेन युद्धानंतर, रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले गेले. त्यावेळी रशियाने भारताला सवलतीच्या दरात ऊर्जा देण्याचा निर्णय घेतला. भारतानेही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने सवलतीच्या दरातील रशियन तेल खरेदी केले. त्यातूनच, भारताने देशांतर्गत बाजारपेठेतील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात यश मिळवले. त्यावेळीही अमेरिका तसेच युरोपीय महासंघाने भारतावर दबाव आणला होता. मात्र, भारताने त्यांना जुमानले नव्हते. हा नवा भारत आहे, याचा विसर ट्रम्प यांना पडावा, हा त्यांचाच दोष!

केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणामुळे भारताने संरक्षण, इलेट्रॉनिस, फार्मा, अवजड उद्योग यांमध्ये स्वदेशीकरणाचे पाऊल टाकले आहे. अमेरिकेच्या कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी संधी उपलब्ध झाली असली, तरी ती भारताच्या अटींवरच. आताही अमेरिकेला भारताशी व्यापार करार करायचा आहे, मात्र तो त्यांच्या अटी-शर्तींवर. भारत ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ असून, अशा बाजारपेठेत प्रवेश करण्यास अमेरिकी कंपन्या उत्सुक आहेत. मात्र, भारताला देशांतर्गत उद्योजकांचे तसेच शेतकर्यांचे हित जोपासायचे आहे. म्हणूनच, हा करार अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. पुढील आठवड्यात भारत-अमेरिका कराराची पुढील फेरी भारतात होणे अपेक्षित आहे. असे असतानाही, अमेरिकेने एकाएकी भारतावर लादलेला कर म्हणूनच अनाकलनीय असाच. ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला म्हणूनच ‘मृत’ असे संबोधले आहे, ते त्यांच्या धोरणांचाच भाग म्हणून हे समजता येण्यासारखे. मात्र, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असे म्हणणे म्हणजे ते त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच लक्षण! राहुल गांधी यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली संपत्ती पाहिली, तर ती गेल्या दोन दशकांत दुपटीने वाढली आहे. भारताची अर्थव्यवस्था ‘मृत’ असेल, तर राहुल यांची संपत्ती इतया झपाट्याने कशी वाढली, या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी द्यावे. म्हणजेच भारतात संधी आहेत, संपत्ती निर्माण होतेय आणि शेअर बाजारही मजबूत आहे. ज्या पाकने दहशतवादाला जोपासले आहे, अशा देशाबरोबर ट्रम्प करार करत असतील, तर केवळ भारताला रोखण्यासाठीच ते पाकला मोठे करत आहेत. कदाचित भारत पाककडून येणार्या काळात तेलखरेदी करेल, अशी ट्रम्प यांनी केलेली दर्पोक्ती याच अमेरिकी ‘बिग बॉस’ मानसिकतेचे द्योतक आहे.

भारतावर अकारण टीका करून अमेरिकेने आपल्या अपरिपक्वतेचे दर्शन केले आहे. मात्र, केंद्र सरकारने संयमाची भूमिका घेत समंजसपणाचे दर्शन घडवले आहे. भारत झुकणार नाही, हेच त्यांनी कृतीतून दाखवले आहे. आजचा भारत हा ताठ मानेने जागतिक व्यासपीठावर भूमिका घेताना दिसून येतो. व्यापार असो वा संरक्षण, भारत आपल्याच अटींवर निर्णय घेतो. अमेरिकेचा दबाव असो, ट्रम्प यांचे बेजबाबदार वक्तव्य असो की ‘नोबेल’साठी त्यांची सुरू असलेली धडपड असो, भारत यापुढे झुकणार नाही, हेच वास्तव. सन्मान आणि हित एकाचवेळी जोपासत जागतिक घोडदौड सुरू ठेवणे, हाच नवा भारताचा एककलमी कार्यक्रम. भारत स्वाभिमानाने, दूरदृष्टीने आणि आत्मनिर्भरतेने पुढे जात आहे. जागतिक राजकारणातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारताचे सुसंयमी नेतृत्व जगाला आश्वस्त करणारे ठरले आहे, हे निश्चित!
Powered By Sangraha 9.0