एसटीचे लवकरचरिटेल इंधन विक्रीत पदार्पण ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

01 Aug 2025 20:39:54

मुंबई : उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणे सोयीस्कर नाही. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे. भविष्यात या कंपन्यांशी व्यावसायिक करार करून सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल व तत्सम इंधन विक्री करणारे पंप उभा करणे प्रस्तावित आहे. हे पेट्रोल पंप रस्त्यालगत व व्यावसायिकदृष्टया मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा २५ बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल! यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक भागीदारीतून चांगला महसूल देखील मिळू शकतो.

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, हा करार केंद्र आणि राज्य शासनाच्या दरम्यान होत असल्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वितरणामध्ये पारदर्शकता राहील. यासाठी संबंधित कंपन्यांनी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सर्व जागांचे व्यावसायिक सर्वेक्षण करून २५१ ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाचे एसटी महामंडळाच्या स्वतःच्या नव्या व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या जागेवर स्थलांतर केले जाईल.
Powered By Sangraha 9.0