महसूल विभाग अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ; महसूल सप्ताहाचा थाटात शुभारंभ

01 Aug 2025 21:22:51

नागपूर : शासनाच्या विविध उपयोजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी महसूल विभागाची असून महसूल विभाग अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करुया, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शुक्रवार १ ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे महसूल दिन आणि सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार परिणय फुके, आ. चरणसिंग ठाकूर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महसूल अपर आयुक्त राजेश खवले, अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खाडे तसेच महसूल विभागातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रत्येक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. त्यादृष्टीने विभागाच्या कार्यपद्धतीमुळे काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. राज्यात पारदर्शी प्रशासनाची सुरवात मंत्रालयापासून-गावापर्यंत सुरू झाली आहे. हीच भूमिका विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. महसूल विभागाचे सर्व प्रशासकीय प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिल्यामुळे ६८ अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवड श्रेणी देवून त्यांना त्यांच्या पुढील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हे पद महत्त्वाचे असून अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीमध्ये रूपांतरीत करण्यात येणार आहे," असे त्यांनी सांगितले.

महसूल दिनानिमित्त मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन झाले. यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राचा पोर्टलचे अनावरण, नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, डिजिटल गाव नकाशा पोर्टलचे लोकार्पण. प्रधानमंत्री आवास योजना, जात प्रमाणपत्र वितरण, मालकीहक्काचे पट्टे वाटप, रेशन कार्ड वितरण, भूमिअभिलेख विभागातर्फे सनद वाटप आदींच्या समावेश आहे. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0