मुंबई : विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादग्रस्त ठरलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलून त्यांना क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद सोपवण्यात आले आहे. तर मंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
गुरुवार,३१ जुलै रोजी रात्री उशीरा राज्यपालांनी खातेबदलाबाबतचा आदेश जारी केला. विधानभवन परिसरात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ आणि यासोबतच वारंवार केलेली वादग्रस्त विधाने यामुळे विरोधकांसह सर्वच स्तरांतून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.
मात्र, त्यांचा राजीनामा न घेता आता खातेबदल करण्यात आले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर या खातेबदलाचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, माणिकराव कोकाटे यांच्याकडचे कृषी खाते मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपण्यात आले. तर भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ हे खाते कोकाटे यांना देण्यात आले आहे.