डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

01 Aug 2025 18:31:10

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील फांद्या उचलण्यात आल्या.

एमआयडीसी विभागातील झाडांच्या फांद्या वीज वितरण कंपनीकडून गेल्या चार-पाच दिवसापूर्वी छाटण्यात आल्या होत्या. वाऱ्याच्या पावसात झाडांच्या फांद्या पडू नयेत याकरिता फाद्यांची छाटणी केली ही बाब चांगली असलीतरी वीज वितरण कंपनीने फांद्या छाटल्या त्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. छाटलेल्या फांद्या उचलणं गरजेचे होते. पण ते गेले नव्हते. याकडे वीज वितरण कंपनीने दूर्लक्ष केले असताना महापालिका किंवा एमआयडीसीकडून त्या उचलणे आवश्यक होते. मात्र या तिन्ही विभागात कोणताही समन्वय नसल्याने फांद्या रस्त्यावरच पडून होत्या. यावर फांद्या उचलल्या नाहीत तर त्या तिन्ही कार्यालयात आणून टाकू असा इशारा कदम यांनी दिला होता. याबाबतचे वृत्त ही 'मुंबई तरूण भारत' ने प्रसिध्द केले. यांची गांभीर्याने दखल घेत शुक्रवारी तातडीने फांद्या उचलण्यात आल्या. शिवसेनेच्या कदम यांनी तरूण भारतचे प्रसिध्द झालेले वृत्त फेसबुकवर प्रसिध्द करत रस्त्याचे कालचे आणि आजचे फोटो पोस्टमध्ये टाकले आहेत.
Powered By Sangraha 9.0