कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची घोषणा; १८ ऑगस्टपासून कार्यवाही सुरू

01 Aug 2025 21:47:30

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ १८ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागणार नाही.

१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात म्हटले आहे की, “राज्यांचे पुनर्रचना अधिनियम, १९५६ (क्रमांक ३७ of १९५६) च्या कलम ५१ (३) अंतर्गत तसेच अन्य संबंधित अधिकारांचा वापर करत, मी आलोक अराधे, मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या मान्यतेने, १८ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व विभागीय न्यायालये बसतील असे निश्चित करतो.”

सध्या मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य खंडीपीठ मुंबईत असून, नागपूर, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि पणजी (गोवा) येथे त्याची इतर खंडपीठे आहेत. आता कोल्हापूर हे चौथे खंडपीठ महाराष्ट्रात स्थापन होत आहे.

या निर्णयामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर अशा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया न्याय व कायदा क्षेत्रातून व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात स्थानिक न्यायप्रणाली अधिक प्रभावी व सुलभ होणार असल्याची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0