मुंबई : मध्य प्रदेशात होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे गुणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या आणि नाले तुडूंब भरले असून अनेक ग्रामीण आणि शहरी भागात पाणी साचले आहे. अशा संकटग्रस्त समयी सेवा भारती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मदतकार्यात गुंतले आहेत व प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
सेवा भारती, मध्य भारत प्रांताने गुणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी पूरग्रस्तांसाठी मोफत अन्न वितरण सेवा सुरू केली आहे. सेवा भारती अन्नपूर्णा भोजनालय, रुग्णालय परिसर, गुणा व सेवा भारती ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र, वृद्धाश्रम केंट, गुणा. दोन्ही केंद्रांमधून ८०० हून अधिक पूरग्रस्तांना अन्न वाटण्यात आले, तर वस्त्यांमध्ये ३०० हून अधिक अन्न पॅकेट वाटण्यात आले.
सेवा भारतीने म्हटले आहे की, जिल्ह्यातील कोणत्याही भागातील पूरग्रस्त व्यक्ती किंवा कुटुंबाला अन्नाची आवश्यकता असल्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि सेवा भारतीचे कार्यकर्ते तात्काळ मदतीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय, सेवा भारती अन्नपूर्णा भोजनालयात दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पूरग्रस्तांसाठी अन्नसेवा उपलब्ध असेल.