मुंबई : "सध्याची परिस्थिती आणि देशाचं नेतृत्व आपल्याला सांगत आहेत की भारताने आता आत्मनिर्भर व्हायलाच हवं. आपली प्रगती आपल्याच बळावर करावी लागेल. सर्व प्रकारच्या बळात वाढ झाली पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं असेल, तर आपला ‘स्व’ संपूर्णपणे समजून घेतला पाहिजे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वारंगा स्थित अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरातील ‘डॉ. केशव बळिराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुल’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कुलगुरू डॉ. हरेराम त्रिपाठी, माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, डॉ. उमा वैद्य आणि संचालक कृष्णकुमार पांडे उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले की, जिथे ‘स्वत्व’ असतं, तिथेच बळ, शक्ती आणि लक्ष्मीचं अस्तित्व असतं. जर ‘स्वत्व’ नसेल, तर बळही नष्ट होतं. जेव्हा आत्मनिर्भरता येते, तेव्हा बळ, शक्ती आणि लक्ष्मी आपोआप येतात. भारताची परंपरा फारच प्राचीन आहे. पश्चिमेचा इतिहासही धरला, तरी इ.स. १ ते १६०० या कालखंडात भारत सर्वांत पुढे होता. आपण आपल्या स्वत्वावर ठाम होतो. पण जेव्हा आपण ते विसरायला लागलो, तेव्हा आपला ऱ्हास सुरू झाला आणि आपण विदेशी आक्रमकांचे बळी ठरलो. इंग्रजांनी तर आपल्या बुद्धीला गुलाम बनवण्याचाही मार्ग शोधून काढला. जर आपल्याला खरोखरच आत्मनिर्भर व्हायचं असेल, तर आपल्याला आधी ‘स्व’ समजून घ्यावा लागेल.
भाषा म्हणजे ‘स्वभाव’ व्यक्त करण्याचे साधन असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते म्हणाले, भाषा ही आपल्या ‘स्वभावा’चं (स्वभावधर्माचं) माध्यम आहे. लोकांची जीवनशैली भाषेवर आधारित असते. समाजाचा जो भाव असतो, तशीच त्याची भाषा असते. पश्चिमी देशांनी जागतिक बाजाराचा विचार जगभर पसरवला, पण तो अपयशी ठरला. भारताने त्यांना “वसुधैव कुटुंबकम्" हा विचार दिला.
संस्कृत भाषा जीवन व्यवहारात यायला हवी
सरसंघचालक म्हणाले, संस्कृतचं ज्ञान म्हणजे भारताचं ज्ञान. जो संस्कृत शिकतो, तो कोणतीही भाषा सहज शिकू शकतो. आपल्या परंपरा आणि भावना या संस्कृत भाषेतूनच विकसित झाल्या आहेत. हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. जर ही भाषा आपल्या जीवन व्यवहाराचा भाग बनली, तर संस्कृत आपोआप विकसित होईल. शब्दसंपत्तीचा सर्वांत मोठा खजिना संस्कृतमध्ये आहे, आणि ती अनेक भाषांची जननी आहे. भारतातील सर्व भाषांचं मूळ संस्कृत आहे. भाषा ही देश, काल आणि परिस्थितीनुसार विकसित होत असते. त्यामुळे संस्कृतला जीवनात आणून आपण ती बोलण्यास पात्र झालं पाहिजे.
संस्कृतला राजाश्रयासोबतच जनाश्रयही मिळावा
संस्कृतला राजाश्रय हवा आहे. परंतु फक्त सरकारपुरता मर्यादित न राहता, जनतेतूनही तिचा आश्रय व्हायला हवा. भारतीयांची अस्मिता जागवण्यासाठी भारतातील सर्व भाषांचा आणि त्यांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचा विकास आवश्यक आहे. त्यामुळे संस्कृतला केवळ राजाश्रय नव्हे, तर जनाश्रयही मिळाला पाहिजे. या दिशेने संस्कृत विद्यापीठांची जबाबदारी खूप मोठी आहे. संस्कृतला जनाश्रय मिळावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे सरसंघचालकांनी सांगितले.
संस्कृत विद्यापीठाच्या योगदानासाठी सदैव तत्पर
"संस्कृत भाषा ही ज्ञानभाषा आहे. ही भाषा अधिक समृद्ध होऊन तिची परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत गेली पाहिजे. जगातील सर्व भाषांमध्ये सर्वात समृद्ध भाषा म्हणून संस्कृतकडे पाहिले जाते. ही भाषा ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे या भाषेचे संवर्धन आणि संशोधन होणे महत्वाचे आहे. उत्तम ज्ञान द्यायचे असल्यास आज एकविसाव्या शतकात आपल्याला पारंपारिक आणि आधुनिक शिक्षण पद्धतींचा समागम करावा लागेल. गुरुकुल पद्धतीसोबतच चांगली पायाभूत व्यवस्थादेखील तयार करावी लागेल. संस्कृत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाची पायाभूत सुविधा तयार केली पाहिजे. त्यासाठी एक चांगला मास्टरप्लान करून आवश्यक तो सगळा निधी उपलब्ध करून दिला जाईल. एका कालमर्यादेत हे विद्यापीठ उभे करून जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न करू."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री