अनिल अंबानींवर ईडीची टांगती तलवार! कर्ज घोटाळ्याप्रकरणी बजावले समन्स, ५ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

01 Aug 2025 12:29:28

मुंबई : (Anil Ambani) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ३ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांना समन्स बजावले आहेत. ईडीकडून ५ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी त्यांना ईडी मुख्यालयात (नवी दिल्ली) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्याच आठवड्यात, ईडीने रिलायन्स समूहाशी संबंधित अनेक संस्था आणि व्यक्तींच्या जागेवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) छापे टाकले होते. या कारवाईत मुंबईतील ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये सुमारे ५० कंपन्यांचा समावेश आहे. तसेच २५ हून अधिक लोकांची चौकशीही करण्यात आली.

नेमकं काय आहे प्रकरण?

तीन हजार कोटी रुपयांच्या कर्जाशीसंबंधित हे प्रकरण आहे. येस बँकेने दिलेले तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज अन्य कंपन्यांत वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनिल अंबानींशी निगडीत ३५ ठिकाणांवर २४ जुलैला ईडीचे छापे टाकण्यात आले होते. २०१७ ते २०१९ दरम्यान तीन हजार कोटींचे कर्ज अन्यत्र वळवले, असा आरोप आहे. बँकेच्या प्रमोटर्ससह अन्य अधिकाऱ्यांना अंबानींनी लाच दिल्याचा संशय आहे. येस बँकेकडून अंबानींची पत न बघता जुन्या तारखांवर कर्जवाटपाचा संशय आहे. कर्जाच्या बदल्यात अनिल अंबानींनी २ हजार ८५० कोटींचे येस बँकेचे बाँड घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अंबानींनी घेतलेले २ हजार ८५० कोटींचे बाँड्स माफ करुन पैसा उचलला.

सीबीआयने दोन प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला होता. ही प्रकरणे येस बँकेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडला दिलेल्या दोन वेगवेगळ्या कर्जांशी संबंधित आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये सीबीआयने येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांचे नाव घेतले होते. अंबानी यांना ५ ऑगस्ट रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL), रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) या दोन कंपन्यांना दिलेल्या कर्जांबद्दल आणि निधीच्या संशयास्पद वळवण्याबद्दल त्यांना विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.



Powered By Sangraha 9.0