रंग-रेखांचा ‘सृजन’संवाद!

01 Aug 2025 20:49:10

‘सृजन’ या मुंबईत आयोजित कलाप्रदर्शनाच्या माध्यमातून ऋतुचक्राच्या वेगवेगळ्या छटा कलारसिकांना अनुभवायला मिळतात. ‘रहेजा स्कुल ऑफ आर्ट्स’च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साकारलेला हा अनुभव कसा आहे, याचा घेतलेला परामर्श.

पावसाचा बहर जीवनात असंख्य वेगवेगळे रंग भरत असतो. या पर्जन्याच्या सरी आपल्या भोवतालची निसर्गसृष्टी केवळ खुलवतचं नाही, तर एक वेगळा तजेलदारपणा यावेळी या निसर्गसृष्टीला आणि आपल्याला अनुभवायला मिळतो. हा बहर ज्यावेळी कागदावर उमटतो, त्यावेळी त्याची एक सुंदर कविता होते. हा बहर ज्यावेळी रंग-रेखांच्या समन्वयातून आपल्याला भेटतो, तेव्हा जन्माला येतात अनेक अद्भुत चित्रं. ही चित्रं निसर्गाचं एक अत्यंत वेगळं रूप आपल्याला दाखवतात. चित्रकाराचं वेगळेपण याच गोष्टीमध्ये आहे की, तो चित्रांच्या माध्यमातून निसर्गाचं आणि आपलं एक अत्यंत वेगळं नातं विणतो. शब्दांच्या पलीकडे, रंगांच्या माध्यमातून निसर्गाच्या विविध छटा कागदावर, कॅनव्हासवर उमटतात आणि एक सक्षम कलाकृती आकाराला येते. परंतु, ही कलाकृती जन्माला येण्यासाठी, त्यामागे कलाकाराला अपार मेहनत करावी लागते. त्याची ही साधना केवळ काही वर्षांची नसून, आयुष्यभराची असते. मोठमोठ्या इमारती, दुतर्फा रस्ते, वेगवेगळ्या वाहनांचे आवाज या सगळ्या गराड्यात आपण आपला दिवस काढतो. मात्र आता, निसर्गाची ही वेगळी अनुभूती आपल्यालासुद्धा घेता येणार आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ‘एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स’च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘सृजन’ या आगळ्यावेगळ्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दि. २९ जुलै ते दि. ४ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी इथे कलारसिकांना हे प्रदर्शन बघायला मिळणार आहे. २२ व्यावसायिक चित्रकारांच्या कुंचल्यातून उमटलेल्या या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे, निसर्गाच्या असंख्य वेगवेगळ्या छटा यावेळी या कलाकारांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून साकारल्या आहेत. निसर्गाचं एक नितांत सुंदर आणि प्रवाही रूप आपल्याला या माध्यमातून अनुभवायला मिळते.

निसर्ग हा माणसाशी वेगवेगळ्या रूपांत संवाद साधत असतो, ऋतुचक्राच्या माध्यमातून सृष्टीमध्ये होणारे परिवर्तन, हे त्या संवादाचं एक मोठं रूप. मात्र, एखादी खळखळ वाहणारी नदी किंवा सोसाट्याचा वारासुद्धा, आपल्याशी हितगुज करत असतो. चित्राच्या माध्यमातून ही सौंदर्यसृष्टी उभी करणं, ही अत्यंत अवघड कला. उदाहरणार्थ, रवींद्र काजरी यांच्या ‘अरण्य प्रकाश’ या चित्रामध्ये आपल्याला असं दिसून येईल की, निसर्गातील परिवर्तनामुळे भोवतालचे रंग एकजीव झाले आहेत. रंगांचं अत्यंत मनोवेधक चित्रण लक्षवेधी ठरतं. ऋतू कुठलाही असो, पण अबोलीचा बहर केवळ निसर्गालाच नाही, तर मनालासुद्धा खुलवणारा असतो. त्या अबोलीच्या वेगवेगळ्या छटा कागदावर कशा रितीने उमटू शकतात, तिच्याभोवतीच्या तांबड्या मातीचं रूप कसं असू शकतं, याचं सुद्धा हृद्य चित्रण एका चित्रात पाहायला मिळतं.

पावसाळ्यात बाह्य स्तरावर जसे बदल होतात, त्याच प्रकारे आपल्या मनाच्या अंतरंगातसुद्धा अनेक बदल होतात. मनावर उमटणार्या या वेगवेगळ्या भावनांचे चित्रण आपल्याला रवींद्र पवार यांच्या चित्रांच्या माध्यमातून अनुभवायला मिळतात. मन ही गोष्ट प्रचंड गुंतागुंतीची आहे, आपलं मन आपल्या भोवतालावर सातत्याने प्रतिक्रिया व्यक्त करत असते. एका प्रकारे या प्रतिक्रियांचे प्रारूप आपल्याला त्यांच्या चित्रामध्ये बघायला मिळतं. रंगांची आपली एक स्वतंत्र बोली असते, ही चित्रं त्याच बोलीचा शोध घेऊ पाहतात की काय, असंच एका क्षणासाठी आपल्याला वाटून जातं.

पावसाच्या या मनमोहक रूपाचे दर्शन घेत असताना, वाटेत श्यामसुंदराची भेट झाली नसती, तरच नवल! भगवान श्रीकृष्ण आपल्याला विविध रूपांत भेटतात. आपल्या निळ्या वर्णातून, सबंध सृष्टीमध्ये चैतन्याचे रंग भरणारे कृष्ण मुरारी, पायरीवर बसून कपाळाला टिळा लावत आहेत, हे चित्र मनाला स्पर्शून जाणारं तर आहेच, परंतु प्रदर्शनातील चित्र संचितामध्ये उठून दिसणारंसुद्धा आहे. निसर्गाची ही सगळी समृद्धी अनुभवताना आपण आपसूकच पोहोचतो, ते गंगेच्या घाटावर. गंगेचा घाट म्हणजे मोक्ष, अशी आजसुद्धा कोट्यवधी भाविकांची भावना. एकप्रकारे आपल्या सणातच संस्कृतीचं समृद्ध दर्शन या परिसराच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी घडत असतं. गंगेच्या घाटाचं हे विहंगम दृश्य, श्रीधर बादेकर यांनी अत्यंत बारकाईने साकारलं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, गंगेच्या तीरावर सुरू असलेल्या उत्सवाला, आधुनिक रूप लाभलं. मात्र आता आहेत, त्या प्रकारची संसाधने उपलब्ध नसताना गंगेच्या तीरावरचा हा उत्सव कसा असेल, असा एक आगळावेगळा विचार बादेकर यांच्या चित्रांच्या माध्यमातून उमटलेला दिसतो.

श्रीधर बादेकर यांच्या सहकार्यामुळे, हे आगळंवेगळं प्रदर्शन उभारले गेले. या प्रदर्शनाचा हेतू केवळ कलात्मक मांडणी एवढाच नसून, कलारसिकांसमोर ऋतुचक्राच्या परिवर्तनाचा विचार ठेवणे हा आहे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा निसर्गाचा, निसर्गातील रंगवैभवाचा एक आगळावेगळा विचार कलारसिकांसमोर ठेवता येतो. सदर चित्रप्रदर्शनातील चित्रकार आज वेगवेगळ्या पद्धतीने आपआपली शैली साकारत आहेत, घडवत आहेत. यांना जोडणारा समान धागा आहे तो ‘वांद्रे स्कुल ऑफ आटर्स’चा! दत्तात्रय परुळेकर यांच्या तालमीतून अनेक चित्रकार इथून घडले. प्रत्येकाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कालांतराने ‘रहेजा स्कुल ऑफ आटर्स’च्या माध्यमातून हा वारसा समृद्ध होत गेला. आज याच कला गुरुकुलातील विद्यार्थी स्वतःची आगळीवेगळी अभिव्यक्ती सादर करत आहेत. जे पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

कार्यरत असणार्या चित्रकारांसाठी व्यासपीठ


‘सृजन’ या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून कार्यरत असणार्या चित्रकारांना आम्ही व्यासपीठ प्रदान करतो. ‘रहेजा स्कुल ऑफ आर्ट्स’ची एक समृद्ध परंपरा आहे. त्यातील निवडक कलाकारांच्या कलाकृती आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, त्यांचा जो सृजनात्मक आणि वेगळा विचार आहे, तो लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असतो. त्यामुळे कलारसिकांनी या चित्रप्रदर्शनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या प्रदर्शनाला भेट द्यावी.

- श्रीधर बादेकर, माजी प्राचार्य, रहेजा स्कुल ऑफ आटर्स
९९६७८२६९८३

Powered By Sangraha 9.0