हिंदुत्ववाद्यांना टार्गेट करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; पुराव्यांअभावी कारवाई करण्याचा पोलिसांवर दबाव

01 Aug 2025 15:53:42

नागपूर : हिंदूत्ववादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र होते. परंतू, त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळू शकला नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी दिली.

नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कालच्या निकालानंतर आपल्या सर्वांपुढे काँग्रेस पक्षाने तयार केलेले हिंदू आतंकवाद आणि भगवा आतंकवाद हे नरेटिव्ह उघड झाले आहे. ज्यावेळी संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडत होत्या आणि इस्लामिक दहशतवाद हा जगात चर्चेचा विषय होता, यामुळे आपल्या मतदारांमध्ये संताप निर्माण होऊ नये यासाठी हिंदू दहशतवादाचा सिद्धांत तयार करून लोकांना अटक करण्यात आली. कुणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवले नव्हते. पण तरीदेखील सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाने आणि युपीएने हे षडयंत्र रचले. हिंदूत्ववादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचे हे षडयंत्र होते. परंतू, त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळू शकला नाही."

हळूहळू सगळ्या घटना बाहेर येतील

"पुराव्यांअभावीही कारवाई करा, असा दबाव पोलिस यंत्रणेवर आणण्यात आला. पण पोलिस यंत्रणेतील अनेक प्रमुख अधिकारी या दबावाला बळी पडले नाही. त्यामुळे पुढची कारवाई होऊ शकली नाही. अन्यथा, हे अत्यंत खोल रुतलेले षडयंत्र होते. मात्र, आता त्याचा पर्दाफाश झाला असून हळूहळू यातील सगळ्या घटना बाहेर येतील. त्यावेळी देशातील आणि राज्यातील सरकारने हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदू संघटनांना संपवण्यासाठी प्रयत्न केला हे यातून लक्षात येते," असेही त्यांनी सांगितले.

भगवा, हिंदू आणि सनातनी यांच्यात भेद नाही

काँग्रेस नेते यांना उत्तर देताना ते म्हणाले की, "पृथ्वीराज चव्हाण ज्या मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये असताना प्रधानमंत्री कार्यालयाचा कार्यभार सांभाळत होते त्याच सरकारने भगवा आतंकवाद हा शब्द दिला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही का? भगवा असो, हिंदू असो किंवा सनातनी असो त्यांच्यात भेद नाही. ते सगळे एक आहेत आणि ते सारेच राष्ट्रप्रेमी, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Powered By Sangraha 9.0