पाटणा : (Patna) बिहारची राजधानी पाटणा शहर पुन्हा एकदा एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. जानीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एम्समध्ये कार्यरत असलेल्या नर्स शोभा देवी यांच्या दोन निष्पाप मुलांना काही अज्ञात गुंडांनी जिवंत जाळल्याची अमानवी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेतील मृत मुलांची नावे अंजली आणि अंश अशी आहेत. मुलगी इयत्ता नववीत तर मुलगा पाचवीत शिकत होता
काय आहे नेमकं प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारी ही दोन्ही मुलं शाळेतून परतल्यावर काही गुंडांनी घरात घुसून त्यांना आत बंद केले आणि नंतर घराला आग लावली. यामध्ये दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील लोकांना सर्व काही समजण्याच्या आधीच हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून, मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना वैयक्तिक शत्रुत्वातून घडली असावी किंवा एखाद्या पूर्वनियोजित कटाचा भाग असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अजून कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तथापि, कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की, "हा अपघात नसून पूर्णपणे नियोजित हत्या आहे. तसेच मुलांचे आईवडील शोभा देवी आणि लालन कुमार यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमच्या निरागस मुलांचे कोणाशी वैर होतं?" दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.