बीड : (Mahadev Munde Case) परळीमधील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पिग्मी एजंट असणाऱ्या महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणी चार संशयितांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या चारही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित असणाऱ्या गोट्या गितेला ताब्यात घेण्यासाठी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथक बीडमधून रवाना झाले आहे. गोट्या गित्तेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना कधीपर्यंत यश येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महादेव मुंडे ह्त्याप्रकरणात एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१८ महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या झाली होती. मात्र या प्रकरणी कुठलाच तपास लागला नसल्याने महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरुवारी ३१ जुलैला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडेंनी महादेव मुंडेंचे काही फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले. ते फोटो पाहून मुख्यमंत्री भावूक झाल्याचे ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितले. ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डीजीपींना एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये गुप्त आरोपींची नावं दिली असून नार्को टेस्टची मागणी केल्याचे ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितले.