वायनाडमध्ये मतांची चोरी झाली नाही? सुधीर मुनगंटीवार यांचा राहुल गांधीना सवाल

09 Jul 2025 17:56:08

मुंबई : वायनाडमध्ये तुम्ही जिंकलात तेव्हा मतांची चोरी झाली नाही का? असा सवाल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीवर केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

बिहारमधील पाटणा येथे इंडी आघाडीच्या वतीने बिहार बंद घोषित करण्यात आले होते. यामध्ये राहुल गांधीसुद्धा सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मतांची चोरी सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "इतक्या मोठ्या स्तरावरच्या नेत्याने स्वतःची प्रतिमा एक गंभीर नेता म्हणून केली पाहिजे. राजकारणात अशा पद्धतीने हलके वक्तव्य केल्याने ती गंभीर प्रतिमाच संपुष्टात येते. कर्नाटक आणि हिमाचलमध्ये तुम्ही निवडून आलात तेव्हा मतांची चोरी, ईव्हीएम आठवले नाही. वायनाडमध्ये तुम्ही जिंकलात तेव्हा मतांची चोरी झाली नाही. तुम्ही वायनाडमध्ये जिंकलात तर ती तुमची लोकप्रियता आणि अमेठीमध्ये पराभव झाला तर मतांची चोरी. राजकीय परंपरा असलेल्या इतक्या मोठ्या स्तरावरच्या नेत्याने इतके हलके होऊन राजकारण करण्याऐवजी देशाच्या मूळ प्रश्नांवर तर्काच्या आधारावर बोलावे," असे ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0