चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असल्याचा आरोप, तिरुपती मंदिर प्रशासनाकडून अधिकाऱ्याचं निलंबन

09 Jul 2025 12:02:29

नवी दिल्ली : (Tirupati Balaji Mandir) आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरातील एका अधिकाऱ्यावर तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. ए राजाशेखर बाबू असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सहाय्यक कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. चर्चमधील प्रार्थनेमध्ये उपस्थित राहत ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात सहभागी होत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे.

मंदिर प्रशासनाने काय म्हटलं?

या कारवाईबाबत मंदिर प्रशासनाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) प्रशासनाच्या निदर्शनास आले की, ए राजाशेखर बाबू हे त्यांच्या मूळ गावी पुत्तूरमध्ये दर रविवारी स्थानिक चर्चच्या प्रार्थनेला उपस्थित राहतात, हे वर्तन टीटीडीच्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. त्यामुळे ए राजाशेखर बाबू यांनी मंदिर प्रशासनाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच टीटीडी दक्षता विभागाने आरोपांची सत्यता पडताळून दिलेला अहवाल आणि इतर पुरावे सादर केल्‌यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे", असं निवदेनात म्हटले आहे.


तिरुमला तिरुपती देवस्थान प्रशासनाच्या नियमांनुसार, त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या धर्माचे पालन करण्याची परवानगी नाही. गैर-हिंदू धार्मिक कार्यात सहभाग होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा एक भाग म्हणून टीटीडी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वी देखील टीटीडीने अशाच कारणांमुळे शिक्षक, परिचारिका आणि इतर अधिकाऱ्यांसह किमान १८ कर्मचाऱ्यांची बदलीची कारवाई केली होती.




Powered By Sangraha 9.0