वॉशिंग्टन : (Texas flooding Updates) अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसामुळे ग्वाडालुपे नदीला आलेल्या पुराने थैमान घातले आहे. अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ८४ जणांचे मृतदेह आढळले असून यामध्ये २८ लहान मुलांचा समावेश आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बेपत्ता पूरग्रस्तांचा शोध अजून सुरू आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नदीकाठावर कॅम्पसाठी आलेल्या लहान मुलांना पुराचा फटका बसला. ख्रिश्चन युथ कॅम्पमधील २७ मुली पुरात अडकल्या आहेत आणि अद्याप त्या सापडल्या नाहीत. लोकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पूर प्रभावित भागाला या आठवड्याच्या शेवटी भेट देण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे शुक्रवारी ४ जुलैला पहाटेच्या सुमारास ग्वाडालुपे नदीच्या पाणी पातळी अवघ्या ४५ मिनिटांत २६ फूट (सुमारे ८ मीटर) वाढ झाली. यामुळे अचानक पुराचे अचानक लोंढे परिसरात घुसले यामुळे कॅम्पिंगसाठी राहत असलेल्या भागात पाणी भरले आणि यात मुलांचा बुडून मृत्यू झाला.