कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाणप्रकरणी संजय गायकवाडांची प्रतिक्रिया, म्हणाले, "मला पश्चाताप..."

09 Jul 2025 14:29:27

मुंबई :
आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आता आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी केलेल्या गोष्टीचा मला अजिबात पश्चाताप नाही, असे म्हणत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, "मी १९८६ पासून मुंबईत येतो आणि ३०-३५ वर्षापासून आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये जेवण जेवत असतो. काल रात्री मी नेहमीप्रमाणे दोन चपाती, डाळ आणि भात अशी ऑर्डर दिली. एक घास खाल्ल्याबरोबर मला यात काहीतरी गडबड आहे असे वाटले. दुसरा घास घेतल्याबरोबर मला उलटी झाली. त्यानंतर मी कॅन्टीनमध्ये आलो आणि तिथल्या लोकांना बोलवलं आणि त्या जेवणाचा वास घेण्यास सांगितले. सर्वांनी हे निकृष्ट, सडलेले आणि कुजलेले जेवण असल्याचे सांगितले. त्यामुळे माझी ती प्रतिक्रिया आली."

तक्रार करूनही कारवाई नाही

"यापूर्वीसुद्ध त्या कॅन्टीनमध्ये १५ दिवसांच्या आधीचे नॉनव्हेज यायचे. यासंदर्भात मी एमडीकडे आणि फूड अँड ड्रग्स विभागाकडे तक्रार केली. तिथल्या मालकालाही समजावून सांगितले. अधिवेशनाच्या काळात दिवसाला १० हजार लोक तिथे जेवण करतात. इथल्या कॅन्टीन मालकाला ३० वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो. त्यामुळे त्याची मुजोरी वाढली आहे," असे ते म्हणाले.

उबाठा गटाची दुटप्पी भूमिका

"आज संजय राऊतांनी माझ्यावर टीका केली. परंतू, १० वर्षांपूर्वी राजन विचारे यांनी दिल्लीतील कॅन्टीनमध्ये वेटरच्या तोंडात पोळी कोंबून त्याला मारले होते. ही उबाठा गटाची दुटप्पी भूमिका आहे. मी केलेल्या गोष्टीचा मला अजिबात पश्चाताप नाही. मी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. ज्यावेळी विनंती करूनही काही गोष्टी वारंवार होत असतील शिवसेनेची काहीतरी रीत आहे. कुणी माझ्या जीवाशी खेळत असल्यास मला जीवाचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असेही संजय गायकवाड म्हणाले.

Powered By Sangraha 9.0