प्रिया बापट- उमेश कामत बारा वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार!

09 Jul 2025 15:24:27

priya bapat- umesh kamat will appear together on the big screen after twelve years



मुंबई : 'बिन लग्नाची गोष्ट' या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतील लोकप्रिय आणि लाडक्या जोड्यांपैकी एक प्रिया बापट आणि उमेश कामत हे ‘क्युट कपल’ तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.


पोस्टरमधील दृश्यामुळे खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रिया हाताची घडी घालून, मिश्कील चेहऱ्याने उभी आहे. निर्णयावर ठाम असल्याचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तर उमेश हातात हार घेऊन, डोक्याला मुंडावळ्या बांधून उभा आहे. जणू काही तो लग्नासाठी तयार आहे परंतु, परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. या सगळ्यांतून स्पष्ट होते की, ही गोष्ट पारंपरिक विवाहसंस्थेच्या बाहेर जाऊन नात्यांची नवी मांडणी करणारी आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, "ही गोष्ट आहे प्रेमाची, नात्यांमधल्या समज गैरसमजांची, वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेल्या गाठी सुटण्याची. हा चित्रपट म्हणजे आजच्या काळाचा एक आरसा आहे, ज्यात प्रेक्षकांना स्वतःचं प्रतिबिंब नक्की बघायला मिळेल. काहींना नव्याने प्रश्न पडतील, तर काहींना जुन्याच प्रश्नांची नवीन उत्तरं मिळतील. हलक्या फुलक्या प्रसंगातून मांडलेली ही गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की करेल."


चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य सांगतात, "प्रिया आणि उमेशची केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नेहमीच खास असते. इतक्या वर्षांनी ते माझ्या चित्रपटातून एकत्र येत आहेत, याचा मला आनंद आहे. या चित्रपटाची संकल्पना हटके असून ती आजच्या काळाशी थेट संबंधित आहे."


गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत, 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित या ‘बिन लग्नाच्या गोष्टी’चे सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत.


Powered By Sangraha 9.0