मुंबई : आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. बुधवार, ९ जुलै रोजी विधानपरिषदेतही हा मुद्दा चांगलाच गाजला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी या प्रकरणाची माहिती घेतली असून तो व्हिडिओ बघितला आहे. अशा प्रकारचे वर्तन आपल्या कोणाकरिताही भूषणावह नाही. यामुळे विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचीच प्रतिमा, प्रतिष्ठा कमी होते. आमदार निवासातील सोयी नीट नव्हत्या, भाजीला वास येत होता, अशी माहिती तिथून आली. या सगळ्या गोष्टींची तक्रार करता येते. त्यावर कारवाई करता येते. परंतू, अशा प्रकारे लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे, त्याचे व्हिडिओ येणे योग्य नाही," असे ते म्हणाले.
आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना
"त्यांनी टॉवेलवर मारले किंवा कसेही मारले तरी ते चुकीचेच आहे. यातून सर्व आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जाते. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे. यासंदर्भात अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घेऊन पुढील कारवाई करावी," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.