नागपुरात पावसाचे थैमान! अनेक घरात पाणी, शाळांना सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

09 Jul 2025 11:39:11

नागपूर : नागपूर शहर आणि जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, ९ जुलै रोजी नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नागपूरमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, विदर्भात पावसाचा अलर्ट जरी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर शहर-जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. सद्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


Powered By Sangraha 9.0