धर्मांतरानंतरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांविरोधात व्यापक लढा

09 Jul 2025 18:31:41
 
fight against those taking advantage of reservation after conversion
 
 
पुणे-  धर्मांतरीत झालेल्या हिंदुंना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. यासंबंधी न्यायालयानेच निकाल दिला असून, आपल्या भागातील अशा धर्मांतरीतांना शोधून त्यांच्या नोकऱ्या काढून घ्या,असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना केले.
 
ख्रिश्चन धर्मांतराचा बळी ठरेलेल्या सांगली येथील ऋतुजाला न्याय मिळावा आणि धर्मांतरण बंदी कायदा व्हावा, यासाठी पुण्यात आयोजित मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आयोजित आक्रोश मोर्चाला किर्तनकार संग्राम बापू भंडारे, ॲड. वर्षा डहाळे यांनी संबोधित केले. पडळकर पुढे म्हणाले, "धर्म प्रचार करणे संविधानाने गुन्हा मानला नाही. मात्र अज्ञानाचा, गरिबीचा फायदा घेत किंवा आमिष दाखवून, अत्याचार करत धर्मांतर करणे गुन्हाच आहे. त्यामुळे सात महिन्याची गर्भवती ऋतुजाला करावी लागलेली आत्महत्या ही हत्याच आहे. कारण तिच्यावर ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी अत्याचार करण्यात आले. त्यामुळे आम्ही धर्मातंर विरोधी कायदा येत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही. ज्यांनी धर्मांतर केले त्यांनी दाखल्यावरची हिंदू जात खोडावी. मागासवर्गीयांना मिळणारे राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीची आरक्षणाची लूट बंद करावी. या विरोधात आता व्यापक लढा उभारण्यात येणार आहे.
 
१०० वर्षां पूर्वी हिंदू बहुसंख्य असलेल्या काश्मिरात आज हिंदू नाहिसा झालेला आहे. धर्मांतराची ही वाळवी रोखली नाही तर देशभरात फार वेगळी परिस्थिती नसेल, असेही पडळकर म्हणाले. अॅड डहाळे म्हणाल्या, "धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण आहे. मातीच्या धर्माशी गद्दारी करणाऱ्या पास्टर आणि धर्मांतरासाठी छळ करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी अत्यंत कठोर असा धर्मांतर विरोधी कायदा होणे गरजेचे आहे." तर धनगर समाज धर्मांतराला बळी पडणार नाही. त्यासाठी गावोगावी जाऊन लोकजागरण करू, अशी माहिती विकास लवटे यांनी दिली. राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवळे यांनी प्रास्ताविक केले.
 
 
ऋतुजाचे सांगलीत स्मारक उभे करा - भंडारे
 
ख्रिश्चन धर्मांतराचा बळी ठरेल्या ऋतुजाच्या प्रकरणाकडे राजकीय नजरेतून पाहणे पाप ठरेल, असे मत संग्राम बापू भंडारे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, "फक्त हिंदुत्ववाद्यांनी हा विषय उचलून धरावा अशी परिस्थिती नाही. धर्मांतराच्या छळाला कंटाळून ऋतुजाने प्राण सोडले. ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. प्राण गेला तरी आपला धर्म न सोडणाऱ्या ऋतुजाचे बलिदान येणाऱ्या पिढ्यांना कळावे म्हणून तिचे स्मारक सांगलीत उभारायला हवे. " डॉ. आंबेडकरांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांतराला देशासमोरील धोका सांगितले होते. म्हणूनच त्यांनी बौध्द धर्माचा स्विकार केला. डॉ. आंबेडकरांच्या नावे ख्रिश्चन आंदोलकांनी प्रशासनाला वेठीस धरेणे निश्चितच संविधान विरोधी आहे. असेही ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0