संजय गायकवाडांच्या कृत्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

09 Jul 2025 16:28:08

मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये केलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवार, ९ जुलै रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आमदार निवासातील निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे लोकांना त्रास होऊ शकतो. संजय गायकवाड यांनी ते निकृष्ट दर्जाचे जेवण खाल्ल्यामुळे त्यांना उलटी झाली. त्यातून रागाच्या भरात त्यांनी ते कृत्य केले."

लोकप्रतिनिधींनी जबाबदारीचे भान ठेवावे

"परंतू, आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे. कायदेशीर कारवाई करण्याचे आपल्याकडे अधिकार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कुणालाही मारहाण करणे योग्य नाही. मी संजय गायकवाड यांना समज दिली आहे. लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचे भान ठेऊन वागले पाहिजे," असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "आमच्या सरकारने मराठी सक्तीची केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आमच्या सरकारने राज्य गीत केले. गेल्या अडीच ते तीन वर्षात आमच्या सरकारने मराठी माणसासाठी जे केले ते आपल्या समोर आहे. बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. मुंबईतील मराठी माणूस कुणामुळे दूर गेला? मराठी माणसाचा टक्का का कमी झाला? हे सगळे राजकारण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


Powered By Sangraha 9.0