मुंबई : मीरा-भाईंदर येथील पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. मीरा-भाईंदरमध्ये मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवार, ९ जुलै रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
मंगळवार, ८ जुलै रोजी मनसे, उबाठा आणि मराठी एकीकरण समितीच्या वतीने मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीसुद्धा हा मोर्चा काढण्यात आल्याने मीरा भाईंदर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, आता मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गृह विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या निकेत कौशिक यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्त पदावर वर्णी लागली आहे. तर मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मधुकर पांडे यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) पदावर बदली करण्यात आली आहे.