दिल हुम हुम करे, रूदाली

09 Jul 2025 11:46:31
 
Uddhav Thackeray
 
 
हो आम्ही रडणार! म्हणजे तो आमचा हक्क आहे. अरे कुणाची माय *यली आहे आम्हाला रोखण्याची? (असे शब्द उच्चारावे लागतात. शिट्ट्या, टाळ्या मिळतात) तर ते ‘कमळमास्टर’ आमच्या कार्यक्रमाला ‘रूदाली’ म्हणाले. आम्ही गर्वाने म्हणतो,
 
आम्ही कोण म्हणुनी काय पुससी?
देवाने दिधलेच होते जग आम्हास चांगले
परी स्वतःच झालो कृतिहिन टोमणेबाज
ओळख मिरवतो आमुची
रूदाली म्हणूनी आज
 
काहीही म्हणा, आम्हाला सगळ्यात जास्त कोण ओळखतं, तर ते ‘कमळमास्टर’ फडणवीस! आम्ही आमच्या त्या चुलत भावाला भेटलो. पण, चिकन सुप की तेलकट वडे मला आठवत होते. आमचे नेतृत्व लाथाडून आम्हाला तुच्छ लेखून तो बाहेर पडला (म्हणजे त्याने तसे करावे, अशी परिस्थितीच आम्ही निर्माण केली होती. आमचे कसब आहे ते. उगीच अख्खे 40च्या 40 लोक आम्हाला सोडून गेले का?) आम्हाला सोडून गेल्यावर ‘काय झाडी, काय डोंगर...’ असे म्हणून आनंदोत्सव साजरा करत होते म्हणे. तेव्हापासून जे आमचे रडगाणे सुरू झाले ते आजतागायत. एवढ्या उचापती करून सत्ता मिळवली होती. काहीही झाले, तरी 100 कोटी रुपयांच्या खाली पान हलायचे नाही. विरोधकांना तुरुंगात टाका, कंगना राणावतलाही आम्ही सोडले नाही. आमचे मंत्री तर इतके कार्यक्षम होते की, कायदा-सुव्यवस्थेचा भार पोलिसांना का द्यावा, असा विचार करून विरोध करणार्‍यांना त्यांच्यावतीने स्वतःच बेदम मारहाण व्हायची. करमुसे प्रकरण कोण, कसे विसरेल? इतके कार्यक्षम लोक सत्तेत होते आमच्यावेळी. पण, आता काय? गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. मग आता टोमणे मारल्याशिवाय आम्ही करू तरी काय शकतो? त्यामुळेच टोमणे मारतो, काय मनाला येईल तो बोलतो. आता राहील विजयोत्सवाच. तर मनात धाकधुक आहेच. कारण, चुलत बंधु राजे आमच्यासोबत तर दिसले. मात्र, ते आणि आमचे पवार काकाश्री कधी काय करतील नेम नाही. त्यात संजय आणि ज्यांच्या नावातच ‘अंधार’ आहेत, त्या ताई आमच्या साथीदार आहेत. मग रडू येईल की हसू येईल? खरे आहे ‘दिल हुम हुम करे घबराऐ।’
 
हाच तो काँग्रेसचा न्याय!
 
एप्रिल महिन्यातली घटना. कर्नाटकमध्ये महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्या थेट स्टेजवर आल्या. भाजपच्या या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शने केली. हे सगळे पाहून कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले. त्यांनी हा सगळा राग कुणावर काढला, तर त्यावेळी कर्तव्यावर तैनात असलेल्या साहाय्यक पोलीस अधीक्षक एन. व्ही. बारमणी यांच्यावर. सिद्धरामय्यांनी यांच्यावर हात उगारला. खरे तर त्यात बारमणी यांची काहीही चूक नव्हती. मात्र, तरीही सिद्धरामय्या यांनी त्यांच्यावर हात उगारला. तो मार बारमणी यांनी चुकवला.
 
मात्र, जनतेसमोर आणि सहकारी पोलीस सहकार्‍यांसमोर अपमान झाला. व्यक्तीचा नव्हे, तर ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’चे व्रत स्वीकारलेल्या एका पोलीस अधीक्षकचा हा अपमान होता. त्यामुळे बारमणी भयंकर व्यथित झाले. हा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी जून महिन्यात स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. बारमणी यांनी दि. 14 जून रोजी गृहसचिवांना पत्र लिहून दि. 28 एप्रिल रोजीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. मात्र, त्यांच्या अर्जावर कर्नाटक सरकारने निर्णय घेतलेला नाही. बारमणी यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी हात उगारतानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर पोस्ट झाला. लोकांनी संताप व्यक्त केला. खरे तर ‘देशातले प्रशासन हे आपले अंकित आहे, त्यांना हवे तसे नाचवू,’ ही काँग्रेस पक्षाची भूमिका नवी नाहीच. आणीबाणी लादताना या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही प्रशासनाला त्याच्या अधिकारापासून वंचित केले होते. ‘हम करे सो कायदा’ हाच खाक्या काँग्रेसचा आणि त्यांच्या शीर्षस्थानी असलेल्या नेतृत्वाचा कायमच आहे. त्याला सिद्धरामय्या कसे अपवाद ठरतील? मात्र, काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस पक्ष विसरला की, आता भारत बदलला आहे. भारतीयही जागृत झाले आहेत. अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याची आणि मतपेटीतून उत्तर देण्याची हिंमत जनतेत आली आहे. त्यामुळे पोलिसांवर हात उचलणार्‍या सिद्धरामय्या आणि पर्यायाने काँग्रेसला भारतीय जनता योग्य तो धडा शिकवेलच. एक मात्र आहे, भारतीय नागरिकाचा कर्तव्य बजावत असताना अपमान झाला. यावर राहुल गांधी गप्प आहेत. हाच तो काँग्रेसचा न्याय!
 
 
Powered By Sangraha 9.0