अमृत महोत्सवाचा उंबरठा ओलांडून ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दि. 9 जुलै हा ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चा स्थापना दिवस. तसेच ‘अभाविप’च्या वैचारिक अधिष्ठानाचे उद्गाते यशवंतराव केळकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख...
द्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस असा निश्चित नाही. संघटना म्हणून सरकारी नोंद झाल्याचा दिनांक हाच विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस समजला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पहिली बंदी आली, तो दिवस दि. 4 फेब्रुवारी 1948 होता आणि त्याच कालखंडात अनेक तरुण संघ विचारांकडे आकर्षिले गेले होते. त्यांच्या स्वाभाविक देशभक्तीच्या उत्साहाला चांगले व्यासपीठ मिळावे, म्हणून तत्कालीन संघ नेतृत्वाने विद्यार्थी परिषदेच्या अस्थायी कामाला सुरुवात केली. यथावकाश संघबंदी संपली की पुन्हा विद्यार्थी परिषदेचे समिलीकरण होईल किंवा त्यात आलेले कार्यकर्ते संघकामाशी जोडले जातील, अशी प्राथमिक धारणा ‘अभाविप’ सुरू करण्यामागची होती. त्यामुळे ‘अभाविप’ सुरू करा, असा संदेश देशभर ठिकठिकाणी पोहोचला आणि त्या त्या ठिकाणच्या संघ स्वयंसेवकांना जसा समजला, तसे ‘अभाविप’चे काम सुरू झाले. त्यात म्हणावी अशी सूत्रबद्धता नव्हती. सुरुवातीच्या काळात जयंत्या, पुण्यतिथ्या साजर्या करणे इतक्या पुरतीच त्याची व्याप्ती होती. नंतर संघबंदी उठली. त्यावेळच्या संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांकडे परिवार क्षेत्रातील कुठल्यातरी कामाचे दायित्व दिले जायचे, त्यानुसार जनसंघांचे कार्यालयीन काम पाहणारे प्रा. यशवंतराव केळकर यांना ‘अभाविप’च्या कामाकडे लक्ष द्या, असे सूचविण्यात आले.
विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेनंतर जवळजवळ नऊ वर्षांनी प्रा. यशवंतरावांचा ‘अभाविप’मध्ये प्रवेश झाला. साधी बैठकसुद्धा एक कलाकृती असते, असा भाव मनात ठेवून काम करणार्या प्रा. यशवंतरावांनी जयंत्या, पुण्यतिथ्या साजर्या करणार्या विद्यार्थी परिषदेला आपल्या संपूर्ण कार्यकाळात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ‘अभाविप’ म्हणजे कार्यकर्ता विकासाची सुयोग्य प्रयोगभूमी, सैद्धांतिक पातळीवर संघटनात्मक रचना आणि निम्नतम त्रुटी असलेली कार्यपद्धती जी काळाच्या ओघात परिस्थितीला अनुसरून अधिकाधिक निर्लेप होत जाईल. या सर्व वैशिष्ट्यांच्या मागे यशवंतरावांचे कालसापेक्ष सखोल चिंतन होते. यशवंतराव ‘अभाविप’मध्ये आणि ‘अभाविप’ यशवंतरावांमध्ये इतकी एकरुप आहे की तांत्रिकदृष्ट्या यशवंतराव ‘अभाविप’चे संस्थापक नव्हते, तरीही त्यांच्या कार्यकुशलतेमुळे ते अनेकांना संस्थापक सदस्य वाटतात. ज्या काळात तरुण-तरुणी एकत्र असणे हे तितके समाजमान्य नव्हते, त्यांच्या एकत्र असण्याला ‘उत्श्रृंखल’ याच चष्म्यातून पाहिले जायचे, त्या काळात तरुण-तरुणींच्या एकत्रित भूमिकेतून समाजाच्या प्रत्येक प्रश्नाकडे कसे पाहायचे, त्यांची उत्तरे कशी शोधायची, याचे वैचारिक अधिष्ठान यशवंतरावांनी निर्माण केले.
1965 सालच्या साहचर्य शिबिराच्या समारोपप्रसंगी त्यांनी जे भाषण केले, त्यातून त्यांचे भविष्यवेधी चिंतन समजून येते. आपल्या भाषणात ते स्पष्टपणे सांगून जातात. ”अभाविप’चे कार्य ईश्वरी कार्य आहे. आपल्या भावी आणि उदात्त कार्याचा हा पहिला टप्पा आहे. त्यामुळे आपण मनाशी खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे की, पुढची किमान 40-50 वर्षे आपल्याला देशाच्या पुनर्बांधणीचे काम करायचे आहे. येणारा काळ असे म्हणताना केवळ दोन-चार वर्षांचा विचार करून चालणार नाही; आपण विचार करायला हवा तो संपूर्ण आयुष्याचा. आपल्या आयुष्यातील या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे सर्वांनी आपल्या आयुष्याची रचना करायला हवी.” यातून हे लक्षात येते की, त्यांचे कुठलेही मुक्त चिंतन हे मूलगामी होते. ‘उद्याची भ्रांत’ इतकाच संकुचित विचार त्यांच्या कुठल्याही बोलण्यातून जाणवत नसे. यशवंतरावांनी जे मांडले, तसे ते जगले. त्यांच्या उक्ती आणि कृतीत कधीही अंतर पडले नाही. यशवंतराव कुणाशी तावातावाने वाद घालत आहेत, हे दृश्य कोणाच्याही दृष्टीस पडलेले नाही. पण, त्यांच्याजवळ आपले मन मोकळे करणारे अनेकजण त्यांच्याशी घायकुतीला येऊन बोलताना पाहिले आहेत. आपल्या प्रसन्नतेला कुठेही उणेपणा येऊ न देता, यशवंतराव छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याबरोबर त्याच्या पातळीवर जाऊन संवाद करत असत. त्यातून आपलेपणाचा स्नेहरज्जू अधिकाधिक घट्ट होत जाताना तो कार्यकर्ता ‘यशवंत’ या नावाशी जोडला न जाता संघटनेच्या विचारसारणीशी जोडला जावा, ही त्यांची कार्यशैली अद्भुत होती. हा संवाद संपला की त्यातून सहज निवृत्त होऊन ते दुसर्या कार्यास स्वतःला जोडून घ्यायचे. विद्यार्थी परिषदेची स्थापना झाल्यानंतर यशवंतरावांना विद्यार्थी परिषदेची जबाबदारी घ्यायला सांगितली, ती 1959 साली म्हणजे परिषदेची स्थापना झाल्यानंतर दहा वर्षांनी.
या दहा वर्षांत संघटना म्हणून काही एक कार्यप्रणाली रूढ होत जाते. प्रमुख कार्यकर्त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्याची वहिवाट तयार होत जाते आणि बर्याचदा त्या पलीकडे जाऊन संघटनेच्या वाढीचा, विस्ताराचा विचार होत नाही. याला संघ आणि विद्यार्थी परिषद अपवाद ठरली. 1925 रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापनेच्या 15 वर्षांनी संघाचे भविष्य काय असावे, यांचा सखोल चिंतन वर्ग शिंदी या गावी घेतला होता. अर्थात, यामध्ये स्वतः प. पू. डॉ. हेडगेवार आणि भविष्यातील दोन सरसंघचालक उपस्थित होते. त्यामुळे संघाचा सर्वसमावेशक विस्तार कसा असावा, यांचे प्रारुप तयार होतेच. फक्त कालसापेक्ष त्याची अंमलबजावणी करायचे आव्हान होते. विद्यार्थी परिषदेत सुरुवातीला असे चिंतन, मंथन झालेले नसले, तरी यशवंतरावांनी वेळोवेळी त्याला आकार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जो समूह संघटना म्हणून संपर्कात आहे, तो तरुण आहे; आपल्या व्यक्तिगत भविष्याचा साकल्याने विचार करणारा आहे; इंद्रधनुषी स्वप्नात रमणारा आहे; प्राप्त परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा त्याला प्रतिकार करणारा, प्रतिसाद देणारा आहे. वयाची अल्लडता आहे; बरं-वाईट काय आहे, याची फार समीक्षा न करता आजूबाजूच्या आकर्षणाकडे ओढला जाण्याची शक्यता जास्त असणारा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तरुणाईला ध्येयानुकूल करण्याचे फार मोठ्ठे आव्हान यशवंतरावांनी पेलले. काळाच्या कसोटीवर यशस्वी करून दाखवले. पुन्हा एकदा हे सर्व करत असताना त्यांनी त्यात कुठेही कोरडेपणा येऊ दिला नाही. चौकटीच्या ठशीव सीमारेषा आखून दिल्या नाहीत, पण त्याच्या बाहेर जाण्याने काय हानी होऊ शकते, याचे डोळस अवलोकन करायला शिकवले.
त्यामुळे हुंडा घेतलेल्या प्रमुख कार्यकर्त्याच्या लग्नाला जायचे, पण तिथे जेवायचे नाही, असा साधा पण परिणामकारक धडा त्यालाही आणि संपर्कातील अन्य कार्यकर्त्यांना देऊन गेले. यशवंतरावांनी कार्यकर्ता घडवला. कार्यकर्त्यांचे परिवर्तन घडवून आणले. संघ विचारांनी भारलेली असंख्य माणसे समाजाच्या अनेक स्तरांत कार्यरत आहेत, पण त्याचा मूळ ढाचा ही शाखा कार्यपद्धती आहे. त्याला पायाभूत मानून संघाने माणसे उभी केली आणि त्यांनी आपआपल्या विचारशक्तीला पेलतील, अशी कामे निर्माण केली. ती कधी एकट्याने तर कधी समूहाने सुरू केली. विद्यार्थी परिषदेने थोड्या वेगळ्या वाटेवर मार्गक्रमण करायचे ठरवले. कारण, इथे येणारा तरुण, विद्यार्थी हा फार तर पाच, सात वर्षे संपर्कात राहील. याच काळात त्याला देशभक्तीचे बाळकडू पाजायचे आणि तेही त्याच्या चंचल वृत्तीच्या उच्चतम कालखंडात. त्या पाच, सात वर्षांत त्याला जे समजेल, त्याला अनुसरून समाजाच्या विविधांगात पोहोचून तो काही भलं करू शकतो, असा विश्वास जागवायचा. यशवंतरावांनी या सर्व पैलूंना समोर ठेवून आपल्याबरोबर कार्यकर्त्यांचा संच उभा केला. त्यांनी दीक्षा स्वीकारली. कार्यकर्तानिर्माण प्रक्रियेची वेगळी धाटणी हळूहळू ‘अभविप’चा मार्ग प्रशस्त करत गेली. ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांस “तू हे काम कर” असे सांगितले गेले नाही, पण ज्या ठिकाणी कमतरता जाणवेल, त्या ठिकाणी परिषद कार्यकर्ता गेला आणि आपल्या ताकदीप्रमाणे ती कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्नरत राहिला. त्या अर्थाने परिषदेला ‘अविषय’ कोणताच नाही. संगमनेरच्या अभ्यासवर्गात ‘लैंगिक प्रशिक्षण’ असे सत्र मुद्दाम ठेवलेले होते. त्याचबरोबर, अजून एका वर्गात ‘सद्दाम हुसेन आणि भारतीय शेती’ या विषयावर सत्र होते. एड्स, गॅट करार अशा अनेक विषयांना परिषदेने सत्रात स्थान दिले आहे. पुढेही असे वेगवेगळे विषय येत राहतील. यामागची प्रेरणा आहे ती यशवंतरावांची. तिथे ‘मर्यादेय विराजते’ हा आदेश नव्हता; पण तो अधोरेखित केलेला एक संकेत आहे. संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या विचारप्रणालीत एक अस्पष्ट सीमारेषा जाणवते, तेव्हा लक्षात येते की यामागे यशवंतराव यांच्या संघटन कौशल्याच्या प्रतिभेचा प्रभाव आहे.
त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही कार्यपद्धती रुक्ष किंवा कुठल्याही विशिष्ट कर्मकांडाला कर्मठतेकडे झुकवणारी नव्हती. त्यांचे जीवनचरित्र समान्यपणे तत्कालीन मध्यमवर्गीय घरात असायचे त्यापेक्षा वेगळे नव्हते. तो काळच असा होता की, प्रत्येक घरातील एक तरी सदस्य कुठल्यातरी चळवळीशी स्वतःला जोडून घेत असे. त्या वातावरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा प्रभाव समाजमनावर झालेला होता. पण आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला आपलेसे केले पाहिजे, ही त्यांची जिगीषा केवळ तत्कालिक परिस्थितीमुळे किंवा आकर्षणामुळे निर्माण झाली नव्हती, तर तिथेही तो विचार त्यांना समजेल, उमजेल अशा पद्धतीने अनुभवून पाहिला आणि नंतर ते त्याचे अनुगामी झाले. नंतर मात्र जे स्वीकारले ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अंतरिक ऊर्जेने प्रकट करत गेले. हे प्रकटीकरण करताना स्वतः कायम अनामिक राहिले. अशा अनामिक राहण्याचे त्यांना कधी ओझे वाटले नाही. “मी हे असे जगत आहे, बघ तुला जमते का!” असा प्रसन्न भाव त्यांच्या वागण्यात दिसत असे. त्यांच्या सहवासात येणार्या प्रत्येकाला तो भाव स्पर्शून गेला. अनेकांनी त्या स्वरुपाची अनामिकता अंगी बाणवण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. यशवंतरावांसमोर कोणी एखादा प्रश्न, शंका उपस्थित केली की “तू म्हणतोस ते बरोबरच आहे; पण असं पाहा...” असा म्हणून ते समोरच्या व्यक्तीला त्याच शंकेसाठी, प्रश्नाच्या उत्तरासाठी सम्यक् विचार करायला प्रवृत करत. प्रल्हाद अभ्यंकर यांनी पूजनीय यशवंतरावांना कुंभाराच्या चिंधीची उपमा दिली, ती किती चपखल होती, ते यावरून लक्षात येते.
‘अभविप’च्या वाढीचा आणि विकासाचा इतिहास लिहायचा ठरवला, तर तो कदाचित दहा हजार पानांचा होईल, पण ‘यशवंत - एक चिंतन’ शब्दबद्ध करायचे ठरवले, तर ते 50 हजार पानांच्या पुढे जाईल, इतके ते महत्त्वाचे आहे. यशवंतरावांच्या चरित्राचा आणि त्यांच्या विचारशील कृतिबंधाचा एकत्रित उल्लेख करायचा, तर मला ज्ञानदेव माऊलींच्या शब्दांचा आधार घ्यावासा वाटतो,
जैसें बिंब तरी बचके एवढे।
परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें।
शब्दाची व्याप्ति तेणें पाडें। अनुभवावी॥
जसे सूर्यबिंब केवळ बचकेएवढे दिसते, त्याप्रमाणे यशवंतराव बारीक चणीचे होते. पण, त्यांच्या प्रकाशास त्रैलोक्य ही अपुरेच पडते, त्याप्रमाणे यशवंतरावांच्या कृतिबंधांची शब्दव्याप्ती आणि त्याची सर्वकालीन अर्थव्यापकता अनुभव घेऊनच पाहावी, अशी आहे. यशवंतराव वासुदेवराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने किमान याची अनुभूती घेतली पाहिजे, असे राहून राहून वाटते.