कलेवर नितांत प्रेम करत सातत्याने नवसृजनाचा ध्यास घेत, रसिकसेवेत आत्मानंद शोधण्यासाठी शब्दांची साधना करणार्या मंदार श्रोत्री यांच्याविषयी...
कला म्हणजे केवळ रंग, सूर, शब्द नव्हे, तर कला म्हणजे कलाकाराच्या हृदयातून उमटणारा अनाहत नाद. कलाकार ज्या क्षणी कलेची निर्मिती करतो, त्या क्षणी तो स्वतःला विसरतो आणि त्या कलामय क्षणांत हरवून जातो. हाच तर खरा आत्मानंद! प्रेक्षकांच्या टाळ्यांपेक्षा, प्रसिद्धीच्या झोतातूनही अधिक अर्थपूर्ण असणारा. कलाकारासाठी हा आत्मानंद म्हणजे साधनेतील समाधीच असते. यासाठीच तो जगतोे, त्यातच तो स्वतःला शोधतो, हरवतो आणि पुन्हा नव्याने जन्म घेतो. कारण कला ही त्याची भाषा नसून, त्याचा श्वास असतो आणि त्याच्या जीवनातील खरा पुरस्कारदेखील! असेच आत्मानंदाच्या अनुभूतीसाठी कला जोपासणारे कलाकार म्हणजे मंदार श्रोत्री!
मंदार यांचा जन्म मुंबईचाच. आई आणि वडील दोघेही सरकारी सेवेत. त्यामुळे घरची परिस्थिती मध्यमवर्गीय स्वरुपाची. मंदार यांचे बालपण बोरिवली येथे गेले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्ण केले. अर्थात अभियांत्रिकी शाखेमध्ये शिक्षण झाले असले, तरी तंत्रज्ञानाच्या आधी मंदार यांची नाळ कलेशी जोडली गेली होती. मंदार यांना लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. त्यातच मंदार यांची आजी त्यांना कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात घेऊन जात असे. मंदारही कंटाळा न करता उत्साहाने आजीबरोबर जात असत. कीर्तनामध्ये बुवांनी काय सांगितले, त्याचे सादरीकरण त्याच संध्याकाळी घरच्यांसमोर करून दाखवणे हा त्यांचा शिरस्ता. त्यामुळे आपसुकच मंदार यांच्यातील सभाधीटपणा वाढत होता. शाळेमध्येदेखील अनेक वेळा वर्गातील मुलांसमोर कविता, गोष्ट किंवा नाटुकली यांचे सादरीकरण करण्यात मंदार कायमच आघाडीवर असत. इथेच एका कलाकाराचा जन्म होत होता. आपल्यातील कलाकाराला जपण्याला मंदार यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतरही कायम प्राधान्य दिले.
वास्तविक, मंदार यांना मधल्या काळतच कविता करण्याचा छंद जडला. मात्र, सुरुवातीच्या काळात लेखनाचा मंदार यांना कंटाळा येई. पण, ‘कोविड’ काळामध्ये मंदार यांनी कंटाळा झटकून कलेच्या जोपासनेसाठी कवितालेखनाला प्रारंभ केला. त्यांच्या विविध कविता अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. यानंतर त्यांनी कविता लिहिण्यामध्ये कधीही खंड पडू दिला नाही. कवितालेखनाच्या कामामध्ये तंत्रज्ञानाचीच मदत त्यांना झाल्याचे मंदार मोकळेपणाने सांगतात. मोबाईलवरच कवितालेखन आता शक्य झाल्याने ते टाईप करणे किंवा मजकुरात बदल करणे कागदापेक्षा सोपे असल्याचे मंदार यांना अनुभवास आले. त्यामुळे मंदार यांनी मोबाईलवरच कवितालेखन सुरू ठेवले. त्यानंतर मंदार यांनी एकांकिका आणि स्फुटलेखनही सुरू केले. हळूहळू या सगळ्या सृजनामध्ये मंदार यांना आत्मानंद गवसत होता. सध्या दररोज काहीतरी लिहिण्याचा शिरस्ता मंदार यांनी जपला आहे. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ हा समर्थांचा उपदेश आज मंदार यांच्या दिनचर्येचा भाग झाला आहे.
आजमितीला १२ एकांकिका, एक नाटक, जवळपास ४०० कविता आणि १००च्या वर स्फुटलेखांचं लेखन मंदार यांनी केले आहे. प्रहसने लिहिण्याचे कामही अव्याहतपणे सुरूच असल्याचे मंदार सांगतात. अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये मंदार यांनी अभिनयही केला आहे. दिग्ददर्शन जरी केले नसले, तरीही एकांकिका अथवा नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत मंदार शून्यापासून सहभागी असतात. ‘आनंदयात्री’ या समूहाच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये गेली चार वर्षे मंदार यांच्या एकांकिका सादर केल्या जात आहेत. त्याचबरोबर ते स्वतःदेखील त्यात अभिनय करतात. गेली दोन वर्षे झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कारही मिळाला असल्याचे ते सांगतात. तसेच, ‘सुहास शिरवळकर स्मृती पुरस्कार’ही मंदार यांना मिळाला आहे. त्याचबरोबरीने एका प्रतिष्ठानाच्यावतीने नवीन एकांकिकांच्या अभिवाचनाचा उपक्रम सुरू केला होता. त्यामध्ये जवळपास १०० एकांकिकांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर त्यातील निवडक १२ एकांकिकांचे पुस्तक त्या संस्थेने प्रकाशित केले. या त्यातही मंदार यांच्या एकांकिकेला स्थान मिळाले होते. ‘नीरक्षीर’ नावाने ब्लॉगलेखनही मंदार करतात. लेखन हा मंदार यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, तर दुसरीकडे मंदार यांना चालण्याचादेखील छंद आहे. मंदार यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. चालण्यामुळे ताणतणावाचे नियोजन करण्यात प्रचंड मदत होत असल्याचेही मंदार अधोरेखित करतात.
मुळातच, मंदार यांचे लेखन म्हणजे स्वतःला आनंदित करण्याचा मार्ग आहे. मात्र, राज्य नाट्यस्पर्धेसाठी लेखन करावे, ही महत्त्वाकांक्षा असल्याचेही मंदार नमूद करतात. मंदार यांच्या कलाप्रसारामध्ये समाजमाध्यमांनी मोलाची भूमिका बजावली आहे. मंदार सांगतात की, "बरेचदा वाचक मिळत नसल्याचे अनेकदा बोलले जाते. मात्र, ही वस्तुस्थिती नाही. मराठी वाचकवर्ग आहे आणि तो सुज्ञपणे वाचतोही. मात्र, त्याचे वाचनाचे माध्यम मात्र निश्चितच बदलले आहे.” मंदार यांच्या लेखनाला अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या असून, परदेशातील मराठी मंडळांनीही मंदार यांची परवानगी घेऊन त्यांच्या एकांकिकांचे सादरीकरण तिकडे केले आहे. त्यामुळे वाचकांना आपले लेखन आवडणे हे महत्त्वाचे असल्याचे मंदार सांगतात. आपली कलाकृती रसिकांना आवडते, हाच कोणत्याही कलाकारासाठी खरा आनंद आहे, पुरस्कार आहे, असे मंदार सांगतात. कलेवर नितांत प्रेम करत सातत्याने नवसृजनाचा ध्यास घेत, रसिकसेवेत आत्मानंद शोधणार्या मंदार श्रोत्री यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!