नवी दिल्ली : भारतासोबतच्या व्यापार करारावर स्वाक्षरी करणे आता अंतिम टप्प्यात आले आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. दरम्यान, अमेरिकेने १४ देशांवर नवीन शुल्क जाहिर केले आहे.
आम्ही युनायटेड किंग्डमशी करार केला आहे, आम्ही चीनशी करार केला आहे. आम्ही भारताशी करार करण्याच्या जवळ आहोत. असे इतर देश आहेत ज्यांच्याशी करार करणे शक्य झालेले नाही, त्यांनी आम्ही पत्रे पाठवली आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये म्हणाले.
भारत - अमेरिका व्यापार कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काही महत्त्वाच्या बाबींवर अद्यापपर्यंत एकमत होऊ शकलेले नाही. व्यापार करारावर शिक्कामोर्तब होण्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अमेरिका भारतातील त्यांच्या दुग्धजन्य आणि कृषी उत्पादनांवर लादलेल्या शुल्कात सवलतींची मागणी करत आहे आणि भारत या मुद्द्यावर असहमत आहे. अन्न सुरक्षेबाबत भारताच्या चिंतेमुळे या क्षेत्रांना प्रस्तावित कराराच्या कक्षेबाहेर ठेवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारताने पारंपारिकपणे इतर देशांसोबतच्या मुक्त व्यापार करारांमधून कृषी क्षेत्रात बाहेर ठेवले आहे. अमेरिकेला बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास भारताला इतर व्यापारी भागीदारांनाही अशाच सवलती द्याव्या लागू शकतात. त्यामुळे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.