मुंबई : ‘युनायटेड अगेन्स्ट इनजस्टीस अॅण्ड डिस्क्रिमिनेशन’ अंतर्गत काही बुद्धिजीवींद्वारे हेट क्राईम रिपोर्ट सोमवारी ‘मुंबई प्रेस क्लब’मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्यांनी प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार जून 2024 ते जून 2025 दरम्यान भारतात द्वेषातून 602 गुन्ह्यांच्या घटना घडल्या असून भाजपशासित 11 राज्यांत त्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ही आकडेवारी मांडताना.
हिंदूंविरोधात ‘हेट स्पीच’मुळे झालेल्या एकाही घटनेचा उल्लेख केलेला नाही. इतकेच नव्हे, तर मौलवींकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त आणि द्वेषपूर्ण विधानांचाही उल्लेख यात करण्याचे यात टाळले आहे. हा रिपोर्ट जारी करताना टिस्ता सेटलवाड, हरविंदरसिंग खालसा, अॅड. सुरेश माने, जीनत शौकत अली, इरफान इंजिनिअर, सर्फराज आरझू, सलिम खान आदि उपस्थित होते.
टिस्ता सेटलवाडच्या मते, जानेवारी ते जूनदरम्यान देशभरात 74 घटना ख्रिस्ती समुदायाविरोधात घडल्या, तर पहलगाम हल्ल्यानंतर 180 घटना मुस्लीम समुदायाविरोधात घडल्या. समाजमाध्यमांवरून पसरवलेल्या अफवा याला कारणीभूत आहेत. भारतातून महात्मा गांधींचे विचार हरवत चालल्याचे जीनत अली म्हणाल्या. काही बुद्धिजीवींकडून असेही सांगण्यात आले की, 96 टक्के अल्पसंख्याकांविरोधात ‘हेट क्राईम’च्या घटना घडल्या आहेत. हा रिपोर्ट सांगतो की, शारीरिक हल्ल्यानंतर वर्षभरात 29 मृत्यू झाले. त्यांपैकी 28 पुरुष होते आणि एक महिला होती. हे सर्व मुस्लीम होते. मात्र, व्यासपीठावर उपस्थित मंडळीना जेव्हा पालघर साधू हत्याकांड, नागपूर येथे शिवजयंतीच्या दिवशी पोलिसांवर झालेली दगडफेक, मोहरमच्या काळात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान बिहार येथे मंदिरांवर झालेला हल्ला, हिंदूंविरोधी वादग्रस्त घोषणाबाजी इ.बाबत विचारले असता, त्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.
वर्षभरात 345 घटनांची नोंद
या रिपोर्टनुसार वर्षभरात ‘हेट स्पीच’च्या 345 घटना नोंदवल्या गेल्या. त्यांपैकी 109 घटना राजकीय पक्ष किंवा संलग्न संघटनांच्या सदस्यांशी संबंधित होत्या. या घटनांसाठी भाजप, ‘विश्व हिंदू परिषद’ आणि ‘बजरंग दल’ जबाबदार असल्याचा आरोप बुद्धिजीवींकडून करण्यात आला.
धर्म विचारून मारले तेव्हा हे कुठे होते?
पश्चिम बंगालमध्ये होणारे हिंदूंवरील अत्याचार, पहलगाममध्ये हिंदूंना धर्म विचारून मारण्यात आले, तेव्हा हे बुद्धिजीवी कुठे होते? हा एकप्रकारे सिलेक्ट अॅक्टिव्हिजम आहे. देशविरोधी कृत्यांना, जिहाद्यांना हे लोक पाठीशी घालत आहेत. त्याचा हा रिपोर्ट बोगस आहे. अशा सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हिस्टचा समाजाला धोका असून त्यांच्या विरोधात कारवाई व्हायला हवी.
- श्रीराज नायर, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदू परिषद