खारघरमध्ये दारूबंदीसाठी पावले?

08 Jul 2025 14:21:53


मुंबई : खारघर परिसरात दारूविक्री परवाना रद्द करून दारूमुक्त क्षेत्र घोषित करण्याची मागणी आ.प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या ठरावाने दारूविक्री बंद करण्याची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, विहित प्रक्रियेनुसार अर्ज प्राप्त झाल्यास खारघरच्या एखाद्या वार्डात दारूबंदी लागू करण्यासाठी योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


प्रशांत ठाकूर यांच्या लक्षवेधीवर बोलताना अजित पवार म्हणाले, २००८ आणि २००९ च्या अधिसूचनेनुसार, नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रातील एखाद्या वार्डात दारूबंदीसाठी किमान २५ टक्के महिला मतदार किंवा एकूण मतदारांनी लेखी अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर जिल्हाधिकारी गुप्त मतदानाची प्रक्रिया राबवतील. जर ५० टक्क्यांहून अधिक मतदारांनी (एकूण किंवा महिला) दारूविक्री बंद करण्याच्या बाजूने मत दिले, तर त्या वार्डात दारूविक्री परवाने बंद करण्याचा आदेश जारी होईल, असे पवार यांनी सांगितले.


राज्यात १९७२ पासून नवीन दारूविक्री परवाने देण्यास बंदी आहे. मात्र, विहित प्रक्रियेनुसार परवाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्यास परवानगी आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. ग्रामपंचायतीचे नगरपालिका किंवा महानगरपालिकेत रूपांतर झाल्यास परवान्यांबाबत नियमांनुसार कार्यवाही केली जाते. “कोणीही दारू पिऊ नये, असे आमचे मत आहे. पण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे,” असेही ते म्हणाले.


दारूबंदीचा अनुभव


राज्यातील दोन जिल्ह्यांत दारूबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, अशा ठिकाणी स्थानिक तरुण बाहेरील जिल्ह्यांतून दारू आणून विक्री करतात, असे निरीक्षण पवार यांनी नोंदवले. दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेताना उपस्थित नागरिकांऐवजी एकूण मतदारांपैकी ५० टक्क्यांहून अधिक मतदारांचा किंवा महिला मतदारांचा कौल विचारात घेतला जाईल, असे त्यांनी विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.



Powered By Sangraha 9.0