सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार १५ ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रात परत येणार!

08 Jul 2025 11:28:51

मुंबई : नागपूरच्या भोसले घराण्यातील शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा १५ ऑगस्टपूर्वी लंडनहून महाराष्ट्रात परत आणली जाईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सोमवारी दि.७ जुलै रोजी विधानसभेत आणि विधान परिषदेत दिली.

विधानसभा नियम २९३ अंतर्गत सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना शेलार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांची तलवार लंडनमधील सोथबीज कंपनीच्या लिलावात निघाली होती. ही तलवार मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रयत्नांमुळे ती परत आणण्यात यश मिळाले आहे.”

रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत (१६९५-१७५५) मराठा सैन्याचे सेनापती होते. त्यांच्या शौर्य आणि युद्धनीतीसाठी त्यांना ‘सेना साहेब सुभा’ ही पदवी देण्यात आली होती. या तलवारीवर रघुजी भोसले यांचे नाव कोरलेले असून, तिची मूठ सोन्याची आहे. कदाचित ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ही तलवार परदेशात गेली असावी.

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने परवानग्या मिळवून प्रवीण चल्ला यांच्या सहकार्याने लिलावात बोली लावली. सुमारे ६९ लाख ९४ हजार ४३७ रुपये खर्चून ही तलवार ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. २१ मे २०२५ रोजी यासाठीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. स्टार वर्ल्डवाइड ग्रुप प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून कस्टम क्लीअरन्स, पॅकिंग आणि हाताळणीच्या प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

“जुलै महिन्यात किंवा १५ ऑगस्टपूर्वी ही तलवार सन्मानपूर्वक महाराष्ट्रात परत आणली जाईल आणि सर्वांना प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू,” असे शेलार यांनी सभागृहात सांगितले.



Powered By Sangraha 9.0