मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनातर्फे विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून, अर्ज डाऊनलोड करणे, अर्जाची स्थिती तपासणे, त्रुटींची ऑनलाईन पूर्तता करणे, तसेच वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात मिळवणे या सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहेत.
अर्जदारांसाठी सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, डिजीलॉकर (Digi-locker) च्या माध्यमातून प्रमाणपत्र कुठेही आणि कधीही पाहता येते. समितीकडून मंजूर झालेले वैधता प्रमाणपत्र ई-मेलद्वारेही अर्जदाराला प्राप्त होते.
अर्ज प्रक्रियेदरम्यान मदतीसाठी सचित्र मार्गदर्शक, समर्पित हेल्पडेस्क, टोल-फ्री क्रमांक १८०० १२० ८०४०, व्हॉट्सअॅप हेल्पडेस्क क्रमांक ९४०४९९९४५२ आणि ई-मेल (helpdesk@barti.in) या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.