मुंबई: (Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे.
अविनाश जाधव यांना यापूर्वीच पोलिसांनी शहरात उपस्थित राहू नये, अशी नोटीस बजावली होती. मात्र, अविनाश जाधव यांनी ती नाकारत मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार कायम ठेवला. जाधव यांनी मराठी बांधवांना या मोर्चासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता मोठ्या फौजफाट्यासह अविनाश जाधव यांच्या निवासस्थानी धडक देत त्यांना ताब्यात घेतले. सध्या जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
जाधव यांच्यापाठोपाठ पोलिसांनी मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली.वसईतील मनसेचे जयेंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील यांसह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री तीनच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.मीरारोड परिसरात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मोर्च्यासाठी जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.