मराठी मोर्चा ठरलेल्या मार्गानेच निघाला! मीरा भाईंदरमध्ये मनसैनिक आक्रमक

08 Jul 2025 13:16:49

मुंबई : (Marathi MNS Morcha in Mira bhayandar) मराठीच्या मुद्द्द्यावरुन मीरा-भाईंदर परिसरात मनसे, उबाठा गट आणि मराठी एकीकरण समितीकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वातावरण चिघळले होते. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता मात्र पोलिसांनी अचानक आपली भूमिका बदलत मराठी मोर्चाला परवानगी दिली. सध्या बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन या मार्गाने मोर्चा निघाला आहे.

पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कलम १४४ लागू केल्याने संतप्त वातावरण पाहायला मिळाले होते. परिसरात मनसे, उबाठा गट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठरल्यानुसार सकाळी १० वाजता बालाजी हॉटेल चौकात जमायला सुरुवात झाली. आंदोलकांनी मोर्चाची घोषणा कायम ठेवली आणि प्रत्यक्षात मोर्चा निघाला. पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर घटनास्थळी मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी काही वेळासाठी मोर्चा रोखून धरला. यानंतर मोर्चाला अटींसह परवानगी दिल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, मनसे नेते अभिजित पानसे हेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत."सरकारने हा मोर्चा येऊ नये यासाठी प्रयत्न केला. पोलिसी बळाचा वापर करुन दडपशाही केली. तरीही मराठी माणूस वाकला नाही, हे पाहून ते झुकले आणि मोर्चाला परवानगी दिली गेली. एखादा आमदार मेहता आहे म्हणून काय फक्त मेहता लोकांचाच आहे की काय? सामान्य लोकांचा नाहीये का? एखादा व्यापारी उठून म्हणतो की महाराष्ट्रात हिंदीच बोलणार, त्याला आमच्या लोकांनी प्रसाद दिला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन परवानगी दिली जाते. पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते? हा मराठी माणूस तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, ते घाबरले म्हणून मोर्चाला परवानगी दिली", अशी संतप्त प्रतिक्रिया अभिजीत पानसे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.




Powered By Sangraha 9.0