मुंबई(Abu Salem): १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेला कुख्यात गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सोमवार, दि. ७ जुलै रोजी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्या.राजेश एस. पाटील यांच्या खंडपीठाने फेटाळली. न्यायालयाने यात स्पष्टपणे नमूद केले की, सालेमने २५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अजून तरी पूर्ण केलेली नाही. प्रत्यार्पणाच्या अटींचा आधार घेत त्याने ही सुटकेची याचिका दाखल केली होती.
सालेमने आपल्या याचिकेत केलेल्या दाव्यानुसार, त्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या २५ वर्षांचा कारावास पूर्ण केला असून, त्याला आता सोडण्यात यावे. “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, सालेमच्या अटकेची तारीख १२ ऑक्टोबर २००५ मानली गेली आहे. त्या आधारे, २५ वर्षांची शिक्षा २०३० पर्यंत पूर्ण होणार आहे. हे प्रथमदर्शनी स्पष्ट आहे की २५ वर्षांचा कालावधी अजून तरी संपलेला नाही.” खंडपीठाने कोणताही अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आणि २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत, सालेमचा तुरूंगातून सोडण्याचा दावा फेटाळला.
कोण आहे अबू सालेम?
अबू सालेम हा उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील रहिवासी होता. तो दाऊद इब्राहिमच्या टोळीमध्ये तोफखाना आणि दारू वाहतूक करणारा चालक म्हणून काम करत होता. नंतर त्याने आपल्या मूळ गावी आझमगढमधील बेरोजगार तरुणांना मुंबईत येण्यासाठी आणि दहशतवाद्या कारवाई करण्यासाठी प्रोत्साहन देणारा गँगस्टर बनला. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील तो मुख्य आरोपी होता.