भोपाळ : (Muharram Violence) मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील सैलाना तहसीलमध्ये रविवारी ६ जुलैला मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान काही कट्टरपंथींनी 'हिंदू राष्ट्र' लिहिलेला बॅनर जाळण्याचा प्रयत्न केला. ताजिया मिरवणुकीत 'हिंदू राष्ट्र' लिहिलेल्या बॅनरवर एक तरुण आग लावतानाचा व्हिडिओ सोमवारी ७ जुलैला व्हायरल झाल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
रविवारी रात्री मशीद चौराहा येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला, त्यानंतर हिंदू संघटनांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली. सर्व हिंदू संघटनांनी हे कृत्य जाणूनबुजून करण्यात आले असून भगव्या ध्वजाचा अपमान असल्याचे म्हणत निषेध व्यक्त केला. या घटनेनंतर हिंदू संघटनांनी निषेधार्थ बाजार बंद ठेवला आणि रस्त्यावर हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करण्यात आले.
हिंदू संघटनांनी असेही अधोरेखित केले की, घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, परंतु कोणीही तरुणाला रोखण्यासाठी हस्तक्षेप केला नाही. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अटक करण्यात आलेल्या चार व्यक्ती आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन एएसपी राकेश खाखा यांनी जमलेल्या जमावाला दिले. या आश्वासनानंतर, निदर्शने मागे घेण्यात आली.. त्यानंतर या चारही जणांना अटक करण्यात आली आहे.