संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती भिंत उभारणार, वनमंत्री गणेश नाईक; मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा शिरकाव रोखण्यासाठी उपाययोजना

08 Jul 2025 19:08:33

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नागरिकांचा बिबट्यांच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा शिरकाव होऊ नये यासाठी उद्यानाच्या चारी बाजुंनी भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे येथील नागरिकांचे राष्ट्रीय उद्यानाबाहेर आरे परिसरात म्हाडामार्फत घरे बांधून पुनर्वसन करण्यात येईल, असे वन मंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.

आ. मिलिंद नार्वेकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या वाढत असल्याने त्यांचे मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव होत असल्याच्या घटना घडत असल्याबाबत प्रश्न मांडला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत आ. प्रवीण दरेकर, अभिजित वंजारी, निरंजन डावखरे, भाई जगताप, सत्यजित तांबे, हेमंत पाटील आदींनी सहभाग घेतला. मंत्री श्री.नाईक म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या 54 इतकी आहे. त्यांच्या खाद्यासाठी प्राण्यांची संख्या देखील पुरेशी आहे. छोट्या प्राण्यांचे संगोपन होण्यासाठी पुरेशा प्रमाणात फळझाडे लावण्यात येत आहेत. वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उद्यानाच्या आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उपग्रहाची मदत घेण्याचा देखील विचार सुरू आहे. गस्तीपथकांच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील काही वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात तीन मृत्यू झाल्याची माहिती देऊन त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती मंत्री नाईक यांनी दिली. तथापि मुलांना एकटे सोडू नये याबाबत शासनाच्या वतीने तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्यांच्या आरोग्य तपासणीसाठीच्या केंद्रामध्ये २२ बिबट्यांची सोय असून तेथे त्यांच्यावर औषधोपचार केले जात असल्याची माहिती त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात दिली.
Powered By Sangraha 9.0