मुंबई : राज्यातील वन जमिनींवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे आणि अतिक्रमणे लवकरच उद्ध्वस्त करण्याची कारवाई होणार आहे. याबाबत पुढील दोन महिन्यांत सर्व माहिती संकलित करून अतिक्रमणकर्त्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत दिला.
आ. प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना नाईक म्हणाले, “वन जमिनींवर अतिक्रमण करून धार्मिक स्थळे उभारणाऱ्या संस्थांसह बांधकाम करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई होईल. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या किंवा सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल.”
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कोंदेगाव येथील वन विभागाच्या सर्व्हे नं. ६३ व ६४ च्या जमिनीवर अनधिकृतपणे धार्मिक व शैक्षणिक संस्थेचे बांधकाम झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे परप्रांतीय लहान मुलांना शस्त्रास्त्र व हिंसाचाराचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे स्थानिक भागातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असून हिंसाचाराची शक्यता व्यक्त केली जात आहे, असे प्रवीण दटके यांनी सभागृहात सांगितले.
अशा अतिक्रमणांमुळे महाराष्ट्रातील वनक्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याचे नमूद करत दटके यांनी या प्रकरणात कालबद्ध कारवाईची मागणी केली. वनमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत तातडीने कारवाईचे निर्देश दिले असून, दोन महिन्यांत सर्व अतिक्रमणांची माहिती संकलित करून बुलडोझर कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.