न्यायालयात बॉम्ब फोडण्याची धमकी; संपूर्ण परिसर रिकामा

08 Jul 2025 18:08:19

हैदराबाद(Bomb Threat at Hyderabad): हैदराबादच्या दिवाणी न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात ई-मेल आल्यानंतर संपूर्ण परिसर रिकामा झाला. मंगळवार दि. ८ जुलै रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता हा धमकीचा ई-मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर न्यायालयाचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले. न्यायालय परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला.

‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, पहाटे ३:४३ वाजता प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये म्हटल्यानुसार, ‘कथित बॉम्ब न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आणि न्यायालय संकुलाच्या इतर भागांत ठेवण्यात आला आहे. सकाळी १०:३० वाजता हा ईमेल पोलिसांना कळल्याने तत्काळ खबरदारी घेण्यात आली. धोक्याची शक्यता लक्षात घेता, बॉम्ब निकामी करणारे पथक आणि स्निफर डॉग युनिट्स घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसरात सखोल तपासणी सुरू करण्यात आली.

“आम्ही परिसर रिकामा केला. बॉम्ब शोधपथक तपास करत आहेत. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले. बॉम्ब स्फोटकाची धमकी मिळाल्यानंतर, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांना तातडीने परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले. कोणत्याही अपघातीची घटना टाळण्यासाठी, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलिस यंत्रणा ईमेल पाठवणाऱ्याच्या शोध घेत आहेत. धमकी खोटी होती का, हे तपासाअंती स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून याबाबतीत सांगण्यात आले.




Powered By Sangraha 9.0