भाजपा नेते आ.प्रविण दरेकरांची वनमंत्र्यांना विनंती...

08 Jul 2025 16:53:14

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथे लहान मुले आणि माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढले असून हे हल्ले थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात जेणेकरून भविष्यात बिबट्यांचे हल्ले कमी होण्यास मदत होईल, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.

आज सभागृहात सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सहभागी होत आ. दरेकर म्हणाले की, दामू नगर, केतकीपाडा किंबहुना ठाण्याच्या सीमेवर असणाऱ्या झोपडपट्टीत नागरी मूलभूत सुविधा नसल्याने त्यांना प्रातविधीसाठी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर जावे लागते. त्यावेळी लहान मुलांवर वाघ झडप घालतात. यासंदर्भात शासनाने उपाययोजना कराव्यात जेणेकरून अशा प्रकारे होणारे बिबट्यांचे हल्ले कमी होण्यास मदत होईल.

दरेकरांच्या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला चारही बाजूने भिंत उभी करण्याचे प्रास्तावित असून बऱ्याच प्रमाणात ती उभीही राहिली आहे. उद्यानाच्या अंतर्गत जो भाग आहे तिथे पॅराफाईल्ड रोड तयार करून तिथे सीसीटीव्ही लावण्याचे प्रस्तावित आहे. हा रोड झाल्यावर गस्त प्रभाविपणे राबविली जाईल किंबहुना सॅटेलाईटद्वारे प्राण्यांवर लक्ष ठेवले जाईल. भविष्यात बिबट्यांचे हल्ले लहान मुले, माणसांवर होणार नाही याकरिता वनखात्याची, पोलिसांची यंत्रणा जागरूकता निर्माण करण्याचे काम करेल.


Powered By Sangraha 9.0